GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : युवा महोत्सवातून कोकणचे कलाकार रंगभूमीवर – डॉ. नीलेश सावे

रत्नागिरी: युवा महोत्सवातून कोकणचे अनेक कलाकार रंगभूमीवर आले आहेत. त्यामुळे युवा महोत्सवाकडे त्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. नीलेश सावे यांनी केले.

भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात दक्षिण रत्नागिरीतील १६ महाविद्यालयांच्या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी आज २१ ऑगस्ट रोजी झाली. या महोत्सवाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने केल्यानंतर डॉ. सावे बोलत होते. युवा महोत्सवाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. पूर्वी अशी संधी सर्वांना मिळत नव्हती. मुंबईत जाऊन स्पर्धा करणे शक्य नव्हते. पण रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये प्राथमिक फेऱ्या सुरू झाल्या व राष्ट्रीय पातळीवरही इथले विद्यार्थी चमकू लागले. स्वतःला पारखून बघायचे असेल तर यासारखा रंगमंच कुठेच मिळणार नाही. ओंकार भोजने, प्रथमेश शिवलकर या कलाकारांनीही युवा महोत्सवातून सुरवात केली. आज हे कलाकार मालिका, चित्रपटांमध्ये चमकत आहेत, असेही ते म्हणाले.

डॉ. सावे यांनी युवा महोत्सवाच्या नियोजनासाठी देव, घैसास, कीर महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले. मी विद्यार्थी असल्यापासून म्हणजे १९९५ पासून जवळपास ३० वर्षे या महोत्सवाशी निगडित आहे. मीसुद्धा या महोत्सवातूनच घडल्याचे ते म्हणाले.

या वेळी जिल्हा समन्वयक डॉ. आनंद आंबेकर, सहसमन्वयक डॉ. तारांचद ढोबळे, सदस्य विनायक हातखंबकर, प्र. प्राचार्य मधुरा पाटील, उपप्राचार्य प्रा. वसुंधरा जाधव, सांस्कृतिक प्रमुख सौ. ऋतुजा भोवड उपस्थित होत्या. अध्यक्षीय भाषणात सौ. नमिता कीर म्हणाल्या की, मोठ्या महाविद्यालयांप्रमाणे आता लहान लहान महाविद्यालयांना विद्यापीठाच्या युवा महोत्सव भरवण्याची संधी मिळत आहे, ही चांगली गोष्ट आहे. यातून अनेक विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ मिळणार आहे. डॉ. आनंद आंबेकर यांनी या महोत्सवासाठी प्रोत्साहन, प्रेरणा दिली.

डॉ. आंबेकर यांनीही आपण ३० वर्षे या युवा महोत्सवाशी जोडले गेलो असल्याचे अभिमानाने सांगितले. तसेच वेगवेगळ्या ठिकाणच्या महाविद्यालयांना युवा महोत्सव भरवण्याची संधी मिळाली पाहिजे, असे सांगितले.

भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्ष नमिता कीर, कार्यवाह दादा वणजू व सर्व पदाधिकाऱ्यांनी या महोत्सवासाठी पुढाकार घेतल्यामुळे हा महोत्सव दर्जेदार होणार असल्याचेही सांगितले. युवा महोत्सवात दिवसभर १६ महाविद्यालयांतील जवळपास ६०० विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत, ललित कला आणि साहित्याच्या ३७ स्पर्धांमध्ये भाग घेतला. यातील निवड झालेले विद्यार्थी विद्यापीठस्तरीय महोत्सवात सादरीकरण करणार आहेत.

याप्रसंगी प्र. प्राचार्य मधुरा पाटील म्हणाल्या की, तरुणाईची ऊर्जा व उत्साहाचा हा सोहळा आहे. गेल्या ९ वर्षांत प्राध्यापक, विद्यार्थ्यांची मेहनत व संस्थेचे पाठबळ यामुळे कॉलेज वेगळेपण जपत आहे. कॉलेजला गेल्या वर्षी नॅकचे मानांकन मिळाले असून युवा महोत्सवाने आत्मविश्वास दुणावला आहे. युवा शक्तीच्या ऊर्जेला संधी, प्रोत्साहन व योग्य दिशा द्यावी लागते. त्यासाठी हा युवा महोत्सव एक चार्जिंग स्टेशनच म्हणावा लागेल.

दीपप्रज्वलन व नंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत व विद्यापीठ गीत सादर झाले. त्यानंतर प्राचार्य मधुरा पाटील यांनी सर्व मान्यवरांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सूत्रसंचालन प्रा. मिथिला वाडकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. ऋतुजा भोवड यांनी सर्वांचे आभार मानले.

Total Visitor Counter

2475126
Share This Article