GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण शहरात अवैध भंगार व्यवसाय बोकाळला; कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Gramin Varta
129 Views

चिपळूण : शहरातील दाट लोकवस्तीत मोठ्या प्रमाणावर अवैध भंगार व्यवसाय सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार या भंगार व्यावसायिकांकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसून नगर परिषदेकडे त्याबाबत कोणतीही नोंद उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्यात नगर परिषदेने दिरंगाई केल्याने चिपळूण शहर हळूहळू भंगाराचे केंद्र बनत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेऊन अवैध भंगार व्यवसायांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. समितीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, यापूर्वी चिपळूण नगर परिषद प्रशासनाकडेही याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित भंगार व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र आजतागायत त्या नोटिसांना कोणतेही उत्तर देण्यात आलेले नसल्याची माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना दिली.

नगर परिषद हद्दीत बिनधास्तपणे अवैध व्यवसाय करून हे भंगार व्यावसायिक महसूल बुडवत असून प्रशासनालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाणीतून हितसंबंध जोपासले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी पालिकेने एका भंगार व्यावसायिकाला भंगार साहित्य दिल्याचा प्रकार घडला होता. यावर काही नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर हा विषय दडपण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अशा घटना सातत्याने घडत असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

नगर परिषद प्रशासनाकडून शहर स्वच्छतेबाबत नियमित माहिती दिली जाते आणि विविध सेवाभावी संस्था तसेच नागरिक स्वच्छतेसाठी योगदान देत आहेत. मात्र प्रत्यक्षात लोकवस्तीत, बाजारपेठेत आणि महामार्गालगत सुरू असलेल्या अवैध भंगार व्यवसायांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकरणात जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालून तातडीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. पिंपळी खुर्द येथील रहिवासी जगदीश इंदुलकर यांनी अवैध भंगार व्यवसायाबाबत स्थानिक प्रशासनाने दाखवलेल्या उदासीनतेची कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली.
या वेळी समितीचे अनुराग उतेकर, हेमंत चाळके, विक्रम जोशी, प्रशांत उतेकर, अमित जोशी आणि संजय जोशी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3366978
Share This Article