चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथे नायरा पेट्रोलपंपाजवळ एका दारुड्या ट्रक चालकाने रस्त्याच्या दुभाजकाला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, चालकाच्या निष्काळजीपणामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. ही घटना काल, २५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू रामराव चौधरी (वय ३३, रा. आर.एम.पी. माखणी, ता. गंगाखेड, जि. परभणी) हा (एम.एच.०४-जीसी-५२६०) क्रमांकाचा लॉरी (ट्रक) घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. सावर्डे येथील नायरा पेट्रोलपंपाजवळ आल्यानंतर चौधरीने दारूच्या नशेत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात ट्रक चालवला. यामुळे त्याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या दुभाजकाला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलीस ठाण्याचे सुनील आण्णा साळुंखे (पोहेको/४७८, वय ४८) यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असता, तो दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू रामराव चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सावर्डे पोलीस करत आहेत.
सावर्डे येथे ट्रक चालकाची दारूच्या नशेत दुभाजकाला धडक, गुन्हा दाखल
