‘मेलीस तरी चालेल पण लग्न करणार नाही’ जिव्हारी लागले शब्द, उचलले टोकाचे पाऊल
ठाणे : तरुणाबरोबर 4 वर्षे प्रेम संबंध असताना त्याने गावी जाऊन परस्पर दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याने हादरलेल्या मुलीने तरुणासमोर लग्न करण्याचा हट्ट धरला. मात्र आपले लग्न झाले आहे असे सांगून ‘मेलीस तरी चालेल पण लग्न करणार नाही’ असे सांगितल्याने धक्का बसलेल्या २२ वर्षीय तरुणीने प्रियकरासमोर उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल १४ दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती. अखेर तिने मृत्यूला कवटाळले. या प्रकरणी मृतक तरुणीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
मूळची रत्नागिरीची असलेली ही २२ वर्षीय तरुणी गेल्या काही वर्षांपासून दिवा परिसरात आपल्या बहिणीसोबत राहत होती. तिचे दिव्यात राहणाऱ्या महेश नामक तरुणासोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, महेशने अचानक गावी जाऊन दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याने ही तरुणी मानसिक तणावाखाली होती.
१ जून रोजी सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर ती तरुणी न जेवताच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिने आपल्या बहिणीला फोन करून महेशच्या घराबाहेरच विषप्राशन केल्याचे सांगितले. तिला तातडीने उपचारासाठी दिव्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता, तिने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याचे निष्पन्न झाले.
“मेलीस तरी चालेल, पण लग्न करणार नाही…”
याबाबत तरुणीला विचारणा केली असता तिने सांगितले की, महेशसोबत तिचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, त्याने गावी जाऊन दुसऱ्या मुलीशी लग्न केले. जेव्हा तिने महेशला भेटून लग्न करणार का, असे विचारले तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. रात्रीपासूनच ती मानसिक तणावाखाली होती. सकाळी पाच वाजता ती महेशच्या घरी गेली आणि पुन्हा त्याला लग्न करणार का, असे विचारले. त्यावर महेश म्हणाला की, तो तिच्याशी लग्न करणार नाही आणि “तू मेलीस तरी चालेल,” असेही त्याने सांगितले. याच रागाच्या भरात तिने त्या तरुणाच्या समोरच विषप्राशन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरीतील तरुणीने मुंबईत प्रियकरासमोरच घेतले विष; तरुणावर गुन्हा दाखल

Leave a Comment