GRAMIN SEARCH BANNER

कामथे नदीत रासायनिक सांडपाणी सोडल्याने शिवसेना आक्रमक; प्रदूषण मंडळाला घेराव

चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे घाटात एका रासायनिक कंपनीने थेट नदीत केमिकलयुक्त पाणी असलेला टँकर सोडल्याच्या गंभीर प्रकाराने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कापसाळ आणि कामथे येथील ग्रामस्थांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेतृत्वाखाली चिपळूण येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर आज सोमवारी धडक दिली. संबंधित कंपनीवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करत, अन्यथा तीन दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा तीव्र इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे, अज्ञात रासायनिक कंपनीने कामथे घाटातील नदीपात्रात केमिकलयुक्त सांडपाणी सोडले. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज प्रदूषण मंडळाचे अधिकारी श्री. कुलकर्णी आणि श्री. उत्कर्ष शिंगारे यांची भेट घेत त्यांना धारेवर धरले. यावेळी श्री. कुलकर्णी यांनी “तीन दिवसांत साफयीस्ट कंपनीवर कठोर कारवाई करू” असे आश्वासन दिले. मात्र, शिवसैनिकांनी हे आश्वासन फेटाळून लावत केवळ आश्वासनांवर न थांबता थेट कृती करण्याची मागणी केली.

या प्रकरणातील टँकर मालकावरही गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलकांनी पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे यांची भेट घेतली. श्री. मेंगडे यांनी, “गुन्हा दाखल करणार आहोत,” अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले.

या आंदोलनात युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते, शिवसेना सचिव संभाजी खेडेकर, विभाग प्रमुख राम डिगे, उपशहरप्रमुख भैय्या कदम, संजय चांदे, पार्थ जागुष्टे, राहुल भोसले, संतोष रहाटे, सुभाष साळवी, संतोष जावळे, शैलेश कांबळे, प्रकाश दिघे, सचिन लटके, पांडुरंग व विठ्ठल हरेकर, लक्ष्मण जवरत, प्रवीण खेडेकर, सचिन चोरगे, ओंकार पंडित, अथर्व चव्हाण, मंदार निर्मळ, कृष्णा माटे, महेश गायकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, येत्या तीन दिवसांत प्रदूषण मंडळाकडून आणि पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे आता संपूर्ण चिपळूण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

2475386
Share This Article