GRAMIN SEARCH BANNER

अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट

अलिबाग : येथील समुद्रात असलेल्या खांदेरी किल्ल्याच्या तटबंदीवर मंकला आणि वाघबकरी खेळाचे १२ अवशेष नुकतेच सापडले. हे अवशेष १६, १७व्या शतकातील आहेत. किल्ले रायगडावर ५ ठिकाणी विविध घरट्यांच्या ओसरींवर मंकला खेळ पाहण्यास मिळतात.

‘आर्ट ऑफ प्लेइंग’ आणि ‘आपला कट्टा’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मे महिन्यात बैठ्या खेळांची शोधमोहीम घेतली होती. यात बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले, ममता भोसले, केतकी पाटील, सिद्धेश गुरव, अनिकेत पाटील यांनी सहभाग घेतला.

खांदेरीच्या तटबंदीवर खेळांचे कोरीव अवशेष मिळाले. दुर्गाभोवतीच्या तटबंदीवर विविध ठिकाणी हे कोरलेले आहेत. या पटांमध्ये ‘मंकला’ हा खेळ प्रामुख्याने पाहायला मिळतो. जमिनीवर समांतर रेषेमध्ये समोरासमोर सात ते आठ किंवा त्याहूनही अधिक खड्डे पाहायला मिळतात.

गणिताचे कौशल्य वाढवणारा हा खेळ जगभर विविध नावाने प्रसिद्ध आहे. खांदेरीवर या खेळाचे एकूण १० पट शोधमोहिमेत सापडले आहेत. एका मंक पटावर समोरासमोर सात किंवा आठ खड्ड्यांऐवजी एकूण २७ खड्डे (एकाच पटात) आहेत. खेळाचे हे नवे स्वरूप आफ्रिकेमधील ‘बाओ’ या खेळाशी मिळते-जुळते आहे.

काय आहेत हे खेळ?

खांदेरी येथे सापडलेला दुसरा खेळ ‘वाघबकरी’ आहे. एका विशिष्ट प्रकारची रचना असलेल्या या खेळाचे महाराष्ट्रात ४ ते ५ वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.

वाघाने जास्तीत जास्त बकरीची शिकार करायची आणि बकरीने बचाव करून वाघास कोंडीत पकडायचे, असे नियोजन कौशल्य वाढवणारा हा खेळ आहे.

सरेखन पद्धती वापरून शिकारीचा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेला हा खेळ महाराष्ट्रातील समुद्री किल्ल्यावर सापडलेला पहिलाच खेळ आहे.

खेळाच्या माध्यमातून मनोरंजन

देशात मंकला खेळ कधीपासून आहे, याचा संदर्भ नाही. पण, वेगवेगळ्या राज्यांत या खेळाला वेगवेगळी नावे आहेत. सातगोल, सातगोटी, गोगलगाय, गायव्याली ही काही मराठी-हिंदी नावे.

गुरुपल्यान हे या खेळाचे कोंकणी नाव. राज्यातील कार्ले, भाजे, बेडसे, आगाशीव, गडद लेणी या ठिकाणी हा खेळ कोरलेला आहे.

‘मंकला’ हा आफ्रिकेत प्रचलित आहे. खांदेरीवर सापडलेले हे पट त्या खेळांचा कालखंड सिद्ध करतो. १७ व्या शतकात बांधलेला हा किल्ला शिवरायांच्या सामुद्रिक सामर्थ्याचे प्रतीक आहे. इथे असलेले सैन्य या खेळाच्या माध्यमातून मनोरंजन करत असावेत.

Total Visitor Counter

2475129
Share This Article