रत्नागिरी: आरोग्य विभागाची धडक मोहीम: ६६ क्लिष्ट शस्त्रक्रिया १०० टक्के यशस्वी, चिमुकल्यांना मिळाली नवसंजीवनी

Gramin Varta
60 Views

रत्नागिरी :  जिल्ह्यातील ग्रामीण तसेच नागरी भागातील चिमुकल्यांच्या आरोग्याला भक्कम आरोग्य कवच मिळवून देण्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा’ला (RBSK) मोठे यश आले आहे. आरोग्य विभागाच्या पथकांनी सन २०२६-२७ च्या जुलै अखेर सादर झालेल्या ताज्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल ७४ हजार २२२ बालकांची प्रत्यक्ष आरोग्य तपासणी पूर्ण केली असून, विविध गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६६ बालकांवर क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत १०० टक्के यशाचा टप्पा गाठला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या धडक मोहिमेमुळे गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या अनेक बालकांना वेळेवर मोफत वैद्यकीय उपचार मिळून नवसंजीवनी मिळाली आहे.

जिल्ह्यातील बाल आरोग्याची व्याप्ती वाढवण्यासाठी आरोग्य पथकांनी अंगणवाडी व शाळा स्तरावर विशेष भर दिला आहे. आकडेवारीनुसार, अंगणवाडी स्तरावर २,९१३ अंगणवाड्यांपैकी २,२९३ अंगणवाड्यांमधील (७९ टक्के) तपासणी पूर्ण झाली असून ५१,६१८ बालकांपैकी ३९,३४२ मुलांची (६६ टक्के) वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच शाळा स्तरावर २,९३१ शाळांपैकी १,१८४ शाळांमधील (४० टक्के) तपासणी पूर्ण झाली असून १,९०,३०४ विद्यार्थ्यांपैकी ३४,८८० बालकांना (१८ टक्के) तपासणीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. या तपासणी दरम्यान आजारांची लक्षणे आढळलेल्या अंगणवाडीतील ३,५८५ आणि शाळांमधील ३,३७८ अशा एकूण ६,९६३ मुलांना जागेवरच आवश्यक ते औषधोपचार पुरवण्यात आले.
केवळ प्राथमिक तपासणीवर न थांबता गंभीर आजार आढळलेल्या बालकांवर तातडीने पुढील वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

इतर विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी अंगणवाडीतील ३६ आणि शाळांमधील ३० अशी एकूण ६६ बालके पात्र ठरली होती. या सर्व ६६ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून सध्या एकही प्रकरण प्रलंबित नाही. याशिवाय अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या हृदय शस्त्रक्रियांच्या बाबतीतही पथकाने कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या ७ बालकांपैकी (अंगणवाडी-५, शाळा-२) ६ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित एका बालकावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषधोपचार सुरू आहेत. या मोहिमेंतर्गत पुढील उच्चस्तरीय उपचारांची गरज असलेल्या अंगणवाडीतील ८६५ आणि शाळांमधील ९३३ अशा एकूण १,७९८ बालकांना योग्य त्या संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -
Total Visitors :
4776722
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *