राजन लाड / जैतापूर
सागरी महामार्गावरील वाघ्रण येथील नंदनवन होमस्टे येथे सागरी पोलीस ठाणे, नाटे यांच्या वतीने जेष्ठ नागरिक सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या संवादमधून कोटुंबिक हिंसाचार, जेष्ठ नागरिकांना होणारा त्रास, सायबर गुन्हे, फ्रॉड कॉल्स, मादक पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती, आणि सागरी सुरक्षेचे महत्त्व यावर पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. वैद्यकीय मदतीसाठी आणि तक्रारींसाठी थेट पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच 112 आपत्कालीन क्रमांक आणि त्याचा प्रभावी वापर याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमात गावातील विविध क्षेत्रातील जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये श्रीकृष्ण मयेकर, प्रदिपकुमार मयेकर, पत्रकार राजन लाड, नवनाथ शेलार, प्रकाश व प्रियंका नार्वेकर, मधुकर जोशी, वसंत वाईम, एकनाथ बावकर सुरेश बावकर, पोलीस पाटील गजानन भोगले, पोलीस पाटील दिलीप वालकर मधुकर पावसकर ,संभाजी जैतापकर, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय पाटील आदींचा समावेश होता.
पोलीस पाटील नियुक्त्यांबाबत व गावपातळीवरील सहकार्य या विषयांवर चर्चा झाली. प्रदिप मयेकर यांनी मांडलेल्या प्रश्नांना पोलीस निरीक्षक खेडकर यांनी समर्पक उत्तरे दिली. गावपातळीवर स्वतःच्या पदरमोडीतून सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे विशेष कौतुक करण्यात आले.
व्यासपीठावर पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्यासोबत जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष एकनाथ आडीवरेकर, सचिव रमेश राणे आणि माजी मुख्याध्यापक श्रीकृष्ण मयेकर हे मान्यवर उपस्थित होते.
पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर यांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान कणेरी यांनी केले, तर रमेश राणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास चेऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सागरी पोलीस ठाणे नाटेच्या कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.