GRAMIN SEARCH BANNER

राजापूर रेल्वे स्थानकाच्या छताचा भाग एका वर्षाच्या आतच कोसळला

Gramin Varta
13 Views

निकृष्ट काम झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप

राजापूर : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून साडेचार कोटी रुपये खर्चुन राजापूर रोड रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र सुशोभिकरणाच्या कामाला एक वर्ष पूर्ण होण्याअगोदरच छताचा भाग कोसळल्याने या कामाचा निकृष्ट दर्जा उघड झाला आहे. त्यामुळे प्रवासी व स्थानिक ग्रामस्थांतून कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गतवर्षी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून साडेचार कोटी रूपये खर्चुन राजापूर रोड रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरणाचे काम करण्यात आले आहे. जवळपास तीस वर्षानंतर राजापूर रोड रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण झाल्यानंतर गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात मोठ्या थाटामाटात या कामाचे उद्घाटन करण्यात आले. स्थानकाचे सुशोभिकरण करताना स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या एका बाजूला भव्य अशी प्रोफ्लेक्स सीट शेड उभारण्यात आली आहे. प्रवेशद्वाराच्या प्रांगणात फुलझाडांनी सुशोभित व स्थानिक वृक्षराजीनी असलेल्या बगीचा करण्यात आला आहे.

संपूर्ण सुशोभिकरणासाठी जांभा दगडाचा वापर करण्यात आला आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री स्व.प्रा.मधु दंडवते यांचे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच तैलचित्र लावण्यात आले आहे. स्थानक परिसराभोवती असलेल्या भिंतीवर राजापूरातील पर्यटनाची ओळख सांगणारी भित्तीचित्रे रंगवण्यात आली आहेत. सुशोभिकरणांतर्गत स्थानक परिसरात प्रवाशांसाठी बस थांबे, दुचाकी, चारचाकी, बस आणि रिक्षासाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

गतवर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी अत्यंत घाईगडबडीत रेल्वेस्थानकाच्या सुशोभिकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळीच सदरचे काम दर्जाहीन असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून करण्यात आला होता. कॉक्रीटीकरण करण्यात आलेल्या भागामध्ये तर स्टीलचा वापरच केला गेला नाही. काही ठिकाणी या कॉब नीटीकरणाला भेगा गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. तशा तक्रारी देखील काही ग्रामस्थांनी संबधित विभागाकडे केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

दरम्यान या कामाला अजून एक वर्ष देखील पूर्ण झालेले नसताना या सुशोभिकरण कामाचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या शेडच्या छताचा आतील भाग कोसळला असून अन्य काही भागही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाचे झालेले काम तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी या कामाबद्दल प्रवाशी तसेच ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2648541
Share This Article