GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या ‘आरजू’ कंपनीच्या सूत्रधाराला अटक करा, अन्यथा १५ जुलैपासून आमरण उपोषण

पीडित ग्राहकांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना निवेदन

रत्नागिरी – शहरातील आरजू टेक्सोल प्रा. लि. या कंपनीने शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे पीडित ग्राहकांनी उद्रेकाची भूमिका घेत १५ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर पीडित गुंतवणूकदारांच्या वतीने शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, १९ जून २०२५ रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात या आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी आठ ते दहा दिवसांत कारवाईचे आश्वासन दिले होते. या प्रकरणाचा तपास सहाय्यक अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य सूत्रधार मात्र अद्याप मोकाट आहेत.

पीडितांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मुख्य आरोपींना अटक करावी व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत, अशी स्पष्ट मागणी होती. मात्र ७ जुलैपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे पीडितांनी आंदोलनाचे हत्यार उचलले आहे.

“मुख्य आरोपींना अटक होईपर्यंत आणि आमचे पैसे परत मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असून, या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

या निवेदनावर मानवाधिकार कार्यकर्ते विलास सुर्वे, वंचित बहुजन आघाडीचे गौतम गमरे यांच्यासह अनेक पीडितांची स्वाक्षरी आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री कार्यालय, पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व शासकीय विभागांना पाठवण्यात आल्या आहेत.

या प्रकरणामुळे रत्नागिरीतील गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आता प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Total Visitor

0225049
Share This Article