रत्नागिरी : बस प्रवासादरम्यान चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून एका महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका अनोळखी व्यक्तीने महिलेचे सुमारे १ लाख ८८ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.
सौ. बीसाबी अल्लाबक्ष मकानदार (वय ५०, रा. रत्नागिरी) या पणजी येथून रत्नागिरीला जाण्यासाठी बसमधून प्रवास करत होत्या. पणजीहून सावंतवाडी आणि नंतर कणकवली बसने प्रवास केल्यानंतर त्या मालवण-रत्नागिरी बसमध्ये बसल्या. काल दुपारी १ वाजण्याच्या सुमारास, त्यांच्या शेजारच्या सीटवर एक अनोळखी व्यक्ती येऊन बसला.
बस तळरे बसस्थानकावर थांबल्यावर त्या व्यक्तीने बीसाबी यांना चहा पिण्यासाठी आग्रह केला. त्यांनी नकार दिल्यावर तो एकटाच खाली उतरला आणि नंतर परत येऊन खिडकीतून चहाचा कप बीसाबी यांच्या हातात दिला. त्यांनी तो चहा प्यायल्यानंतर काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि झोप येऊ लागली.
गुंगीच्या अवस्थेतच बीसाबी पाली येथे उतरल्या. त्यांची तब्येत खूपच खराब झाल्याने त्यांना स्थानिक लोकांनी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
शुद्धीवर आल्यावर बीसाबी यांना त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ६० किंमतीचे मंगळसूत्र आणि हातातील २८ हजार किंमतीची अंगठी गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पाली रुग्णालयात चौकशी केली असता, त्यांना रुग्णालयात आणले तेव्हा त्यांच्या अंगावर कोणतेही दागिने नव्हते, असे सांगण्यात आले.
यावरून चहामधून गुंगीचे औषध देऊन शेजारच्या अनोळखी व्यक्तीनेच दागिने चोरले असल्याचा बीसाबी यांचा संशय बळावला. त्यांनी तात्काळ लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपास कणकवली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
प्रवासादरम्यान सतर्क राहा:
प्रवासात अनोळखी व्यक्तीने दिलेले कोणतेही खाद्यपदार्थ किंवा पेये घेणे टाळा.
अनोळखी व्यक्तीच्या जास्त जवळ जाण्यापासून आणि त्यांच्याशी जास्त बोलण्यापासून सावध रहा.
अत्यावश्यक नसताना मौल्यवान वस्तू आणि जास्त रोख रक्कम सोबत ठेवू नका.
कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना किंवा बसमधील इतर प्रवाशांना सूचित करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ब्रेकिंग: बस प्रवासात रत्नागिरीतील महिलेला चहातून गुंगीचे औषध देऊन दागिने लुटले
