GRAMIN SEARCH BANNER

शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी मिळणे हे अभिमानास्पद बाब : शिक्षणाधिकारी किरण लोहार

Gramin Varta
101 Views

गणपतीपुळे प्रभागातील प्रभागस्तरीय मूल्यवर्धन शिक्षक प्रशिक्षणास प्रारंभ

रत्नागिरी : प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना काही बाबी ह्या लक्षणीय असतात. इतर सेवा क्षेत्रात काम करणे ही चांगली बाब आहेच, मात्र समाजाची जडणघडण ज्या ठिकाणी होते. अशा शाळेमध्ये असंख्य मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी मिळणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे मत रत्नागिरी जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी व्यक्त केले.

ते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या या मूल्यवर्धन प्रशिक्षण ३.० चे गणपतीपुळे प्रभागाच्या बीटस्तरीय प्रशिक्षणाच्या  उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, आज अनेक आव्हाने शिक्षण क्षेत्रात समोर उभे असून, त्यासाठी अशी प्रशिक्षणे उपयुक्त ठरत असतात. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक स्वरूपातील ज्ञान मिळावे यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकांनी आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहत असतानाच, सर्व विद्यार्थ्यांना ताणतणावापासून दूर ठेवत, विद्यार्थ्यांची पायाभूत कौशल्ये विकसित होण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम करण्याचे भाग्य उपस्थित सगळ्यांना मिळाले असून, रत्नागिरीला एक वैभवशाली विचारांची परंपरा लाभलेली आहे. ही वैभवशाली परंपरा जपत असतानाच, ती वाढवत शिक्षण क्षेत्राचा गौरव करण्याची संधी आपल्याला शिक्षक म्हणून लाभली आहे, यासाठीचे प्रयत्नपूर्वक काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व  प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर शिक्षणाधिकारी किरण लोहार साहेब यांचे गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावर आणि संदखोल केंद्राचे केंद्रप्रमुख अरविंद महाकाळ यांनी स्वागत केले. त्यासोबतच उपस्थित सर्वांचे स्वागत झाल्यानंतर केंद्रप्रमुख अरविंद महाकाळ यांनी मूल्यवर्धन शिक्षक प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणाचे स्वरूप सांगताना प्रास्ताविक केले.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी तथा या प्रशिक्षण वर्गाच्या प्रमुख सविता तोटावर यांनी आपली भावना व्यक्त करत असताना गणपतीपुळे बीट हे अत्यंत ग्रामीण भागात आणि विस्तारलेले असूनही या बीटमध्ये अनेक शिक्षक, विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या कौशल्याच्या जोरावर जिल्हा, राज्य पातळीवर चमकले असल्यामुळे मला या प्रभागाचा प्रमुख या नात्याने खूप अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी महाराष्ट्र राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटत कवठेवाडी शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे यांचा शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या शुभहस्ते सन्मान झाला. यावेळी यांनी आपले मत व्यक्त करत असताना हा सन्मान शाळेतील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे मिळाला असल्याची भावना व्यक्त करून, प्रत्येकाने नाविन्यपूर्ण उपक्रमाचा ध्यास घेत सातत्यपूर्ण कार्य करत असतानाच आपल्याला नवीन ध्येयाची आठवण करून देत राहिल्यास असे सन्मान मिळत राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाची निवेदन माधव अंकलगे यांनी केले.

यावेळी प्रशिक्षक असणाऱ्या अरविंद महाकाळ, समृद्धी गोणबरे, प्रमोद कांबळे, मनोहर इनामे, मोहन घोंगडे यांचाही सन्मान करण्यात आला.

Total Visitor Counter

2647924
Share This Article