रत्नागिरी: गणपतीपुळे मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. भाविकांसाठी वेशभूषेची नियमावली जाहीर झाली आहे.
गणपतीपुळे मंदिराच्या महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून नियमावली संबंधित बोर्ड लावण्यात आला आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नियमावलीचे पालन करावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपतीपुळे मंदिराच्या महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून ड्रेसकोडचा बोर्ड लावण्यात आला आहे. यात कमी कपड्यातील ट्रीप मूड अथवा समुद्रावर जाणेसाठी करण्यात येणारा पेहराव टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंदिरात गुडघ्यांच्या वर येणारे स्कर्ट्स किंवा ड्रेसेस परिधान करु नये असेही बोर्डवर नमूद केलेले आहे.
असभ्य भाषा किंवा आक्षेपार्ह चित्र असलेले कपडे घालून मंदिरात येऊ नये असेही आवाहन भाविकांना करण्यात आले आहे. ड्रेसकोडचे पालन न करणाऱ्यांना मंडळींना मंदिरात प्रवेश निषिद्ध असेल आणि त्याकरिता आम्हाला भीड घालू नये, असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. १० वर्षांखालील मुलांना या नियमातून सूट आहे, असे बोर्डवर लिहिलेले आहे.
रत्नागिरीतील गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. दरवर्षी देशभरातून हजारो गणेशभक्त गणपतीपुळे या तीर्थस्थानाला भेट देण्यासाठी येत असतात. गणपतीपुळ्याला समृद्ध समुद्रकिनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला अनेकजण देवदर्शनाच्या व्यतिरिक्त सहलीच्या निमित्ताने देखील भेट देत असतात.
गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड लागू!
