रत्नागिरी: खेड तालुक्यात धार्मिक स्थळांवरील चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, शिरगाव खुर्द येथील काळकाई देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच, आता कुळवंडी येथील श्री शिव शंकर मंदिरात चोरी झाल्याचे उघड झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातून पितळ आणि तांब्याच्या १७,८००/- रुपये किमतीच्या वस्तू लंपास केल्या आहेत. ही चोरीची घटना दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजेपूर्वी घडली असण्याची शक्यता आहे. चोरीची नेमकी वेळ समजू शकली नसली तरी, नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात गेलेल्या पुजाऱ्याला ही घटना लक्षात आली.
याप्रकरणी, कुळवंडी येथील रहिवासी मनोहर महादेव जंगम (वय ५२) यांनी खेड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील अंदाजे १२ किलो वजनाची पितळ धातूची एक मोठी घंटा (किंमत ५,०००/- रुपये), दहा लहान पितळी घंटा (किंमत ५,०००/- रुपये), तीन पितळी समया (किंमत १,५००/- रुपये), पाच किलो वजनाचा तांब्याचा नाग (किंमत २,०००/- रुपये), तांब्याची गळती, टोप आणि चार मध्यम आकाराची तांब्याची ताम्हणे असा एकूण १७,८००/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. एकापाठोपाठ एक अशा सलग दोन दिवसांत दोन मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्याने खेड तालुक्यात भाविकांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खेड पोलिसांनी या घटनेची नोंद घेत M.R. क्र. ३०६/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (क) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोन्ही चोरींच्या घटनांचा समांतर तपास सुरू आहे.