गतवर्षी झाडी पडून झाला होता एकाचा मृत्यू
राजापूर : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला एक भला मोठा पिंपळ सध्या अपघाताला निमंत्रण देत आहे. या झाडावर प्रचंड झाडी वाढलेली असून, ही झाडी धोकादायक स्थितीत आहे. ती रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांवर कोसळल्यास मोठा अपघात होऊ शकतो. मात्र मोठ्या प्रमाणात झाडी वाढूनही ती अद्यापही छाटण्यात आलेली नाही. यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नगर परिषदेने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. अपघात होण्याची वाट नगर परिषद पाहतेय का? अपघातानंतरच जाग येणार का? असा संतप्त सवाल वाहन चालक, नागरिकांतून उपस्थित होत आहे.
गेल्या वर्षी याच झाडामुळे आठवडा बाजारात झालेल्या अपघातात एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे यंदा अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मात्र, विजवितरण कंपनी आणि राजापूर नगर परिषद यांच्यातील समन्वय अभावामुळे अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासन आणखी एखाद्या बळीची वाट पाहत आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. संबंधित वृक्षाखाली विद्युत वाहिन्या असल्याने विजवितरण विभागाच्या सहभागाशिवाय झाड छाटणे शक्य नाही. त्यामुळे दोन्ही विभागांनी तात्काळ पावले उचलून संभाव्य धोका टाळावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
राजापूर शहरातील पिंपळावरील धोकादायक झाडी देतेय अपघाताला निमंत्रण

Leave a Comment