कोकण रेल्वेच्या प्रवासात रत्नागिरीचा सुपुत्र रिजनल मॅनेजरपदी; शैलेश बापट यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

Gramin Varta
246 Views

गोळप कट्ट्यावर अविनाश काळे यांनी घेतली विशेष मुलाखत

रत्नागिरी: केळ्ये मजगावसारख्या ग्रामीण भागातून येऊन आपल्या जिद्दीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर कोकण रेल्वेसारख्या महत्त्वाच्या संस्थेत रिजनल मॅनेजर या उच्च पदापर्यंत पोहोचलेले श्री. शैलेश बापट यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. ‘गोळप कट्टा’च्या ८० व्या कार्यक्रमात श्री. अविनाश काळे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत बापट यांनी आपल्या तीन दशकांच्या प्रदीर्घ प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिर आणि फाटक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण करून, १९९१ मध्ये कोकण रेल्वेत कनिष्ठ स्तरावरून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.

सुरुवातीच्या काळात खन्ना कॉन्ट्रॅक्टर आणि विभाकर खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल इंजिनिअरिंगचे धडे गिरवल्यानंतर, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून ते कोकण रेल्वेच्या सेवेत रुजू झाले. संगमेश्वर येथील शास्त्री पुलाच्या बांधकामावेळी आलेली नैसर्गिक संकटे असोत किंवा लँडस्लाईडमुळे उद्भवलेली कठीण परिस्थिती, श्रीधरन साहेबांसारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे आव्हानात्मक काम यशस्वीपणे पूर्ण केले. १९९८ मध्ये त्यांनी एचआर (HR) विभागात प्रवेश केला आणि तिथूनच त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला वेगळी कलाटणी मिळाली. सहावा वेतन आयोग लागू करताना सुमारे दोन हजार कामगारांच्या पगाराचे नियोजन करणे आणि जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या प्रकल्पामुळे त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आयटी विभागाच्या मदतीने कर्मचारी सेवा प्रमाणपत्र, वार्षिक परफॉर्मन्स रिपोर्ट आणि निवृत्ती वेतन सोयीसुविधांसाठी त्यांनी तयार केलेली सॉफ्टवेअर मोड्यूल्स आजही कोकण रेल्वेसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. त्यांना आतापर्यंत तीन चेअरमन पुरस्कारांसह एकूण ११ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

१७ ऑक्टोबर २०२४ रोजी रत्नागिरीच्या रिजनल मॅनेजर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर, रोहा ते मडुरे या ३७८ किमीच्या सर्वात कठीण क्षेत्राची जबाबदारी ते समर्थपणे पेलत आहेत. रत्नागिरी क्षेत्रातील २१०० कर्मचारी आणि १६ विभागांचा ताळमेळ राखताना, दररोज १२ ते १६ तास कार्यरत राहून ते कोकण रेल्वेची सेवा करत आहेत. कोकण रेल्वेच्या क्षमतेपेक्षा जास्त ताण असतानाही गाड्यांचे योग्य नियोजन, ट्रॅकचे नूतनीकरण आणि भविष्यातील दुपदरीकरणाच्या कामांकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. आई-वडील आणि पत्नीच्या खंबीर साथीतून त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले असून, कोकण रेल्वेचे हे ऋणानुबंध त्यांनी आयुष्यभर जपले आहेत. या कार्यक्रमात राजाभाऊ जोग यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *