२३ ते २९ सप्टेंबर दरम्यान प्रदर्शन
संगमेश्वर:- कोकणात वास्तव्य केल्यानंतर उच्च कलाशिक्षण आणि नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत राहिल्या नंतरही कोकणच्या विविध भागात फिरून चित्रकार अमृता आणि निखिल यांनी चितारलेले कोकणचे सौंदर्य एकाहून एक सुंदर अशा चित्रांच्या माध्यमातून कलारसिकांना वरळी मुंबई येथील नेहरू सेंटर कलादालनात २३ ते २९ सप्टेंबर दरम्यान पाहता येणार आहेत.
संगमेश्वर येथील चित्रकार अमृता विद्याधर प्रसादे आणि तीचा पती निखिल पाथरे यांनी हे कोकणी मुद्रांचे प्रदर्शन भरवले असून या प्रदर्शनाचे उदघाटन चित्रकार विक्रांत शितोळे यांच्या हस्ते २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा. संपन्न होणार आहे. यावेळी कलाक्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कलारसिकांनी या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन चित्रकार अमृता आणि निखिल यांनी केले आहे.
चित्रकार अमृता हिचे माध्यमिक शिक्षण व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कुल मध्ये झाले. बालपणापासूनच तीला कलेची आवड असल्याने तीने शासकीय रेखाकला परीक्षेत अ श्रेणी प्राप्त करुन पुढे कला क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन करियर करायचे ठरवले. उच्च कलाशिक्षणासाठी ती मुंबईला गेली आणि तेथे टेक्सटाईल डिझाईनचा डिप्लोमा केला. काहीकाळ अमृताने खाजगी कंपनीत नोकरी केली आणि नंतर चित्रकार आणि वेब डिझाईनर पती निखिलच्या सोबत स्वतंत्रपणे कला व्यवसाय सुरु केला.
मुंबईत व्यवसाय केला तरी कोकण जवळ घट्ट नाळ जोडली गेली असल्यामुळे अमृता आणि निखिल यांनी कोकणच्या विविध भागात फिरून येथील मंदिरे, समुद्र किनारे, घरे, धबधबे यांचे कुंचल्याच्या साहाय्याने उत्तम चित्रण केलं. याच कोकणी मुद्रांचे प्रदर्शन त्यांनी नेहरू सेंटर मध्ये भरवलं आहे. अमृता ही स्केच मास्टर असल्यामुळे तिची पेनातील रेखाटने प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरणार आहे.