लांजा/प्रतिनिधी – लांजा तालुक्यातील वाकेड येथील लक्ष्मीबाग परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका नर बिबट्याचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दीड वर्षांच्या या बिबट्याला आपला जीव गमवावा लागला. घटनेनंतर स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान घडली. अपघातात बिबट्याचा जबडा पूर्णपणे तुटला होता, तर डोके, मान आणि तोंडावरही गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनपाल सारिक फकीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बिबट्या अंदाजे दीड वर्षांचा नर जातीचा होता.
या अपघातामुळे बिबट्याचे शरीर छिन्नविछिन्न झाले होते. यानंतर, मृत बिबट्याचे भांबेड येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या नियमांनुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाल्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.
नुकत्याच झालेल्या या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरधाव वाहनांमुळे वन्यजीवांचे प्राण जात असल्याचे अनेक अपघात यापूर्वीही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर, वाहनचालकांनी रात्रीच्या वेळी वन्यप्राणी आढळल्यास अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.