संगमेश्वर/ दिनेश अंब्रे: संगमेश्वर तालुक्यातील नावडी पोस्ट आळी येथील ज्येष्ठ चित्रकार श्री. ऋषिकांत भिकाजी शिवलकर यांनी आपल्या आयुष्यभराच्या कलाजीवनातून केवळ चित्रकला आणि अभिनयच नव्हे, तर गणेशमूर्ती निर्माण या पारंपरिक कलेला देखील नवसंजीवनी दिली आहे. आज वयाच्या उत्तरायुष्यात विश्रांती घेत असलेले शिवलकर हे एकेकाळी संगमेश्वरातील चित्रकलेचा भक्कम आधारस्तंभ मानले जात होते.
सन 1970 पासून त्यांनी आपल्या चित्रकलेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्या काळात गावात मोजक्याच पेंटरची संख्या होती. मात्र, ऋषिकांत शिवलकर यांनी बोर्ड पेंटिंग, वॉलपीस, साधू-संत व देवी-देवतांची चित्रे, यासह अनेक चित्रप्रकारात निपुणता मिळवली. अभिनयक्षेत्रातही त्यांनी आपल्या नाटकांतील रंगभूमीवर “पांडू हवालदार”, “दादा कोंडके” यांसारख्या भूमिका करून रसिकांची दाद मिळवली.
चित्रकलेच्या प्रवासात पुढे जाऊन त्यांनी गणेशमूर्ती तयार करण्याचा उपक्रम सुरु केला. सन 1984 मध्ये केवळ ११ मूर्ती तयार करून त्यांनी आपल्या चित्रशाळेतील या गणेश कार्यशाळेची सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमात पत्नी कै. सौ. स्मिता यांची मोठी साथ होती. मुलगा मंदार व तुषार देखील वडिलांच्या कलेतून प्रेरणा घेत गणेशमूर्ती साकारू लागले.
आज त्यांच्या कारखान्यात १ फूट ते ५ फूट उंचीच्या सुमारे २८० मूर्ती तयार होतात. यामध्ये शाडू मातीसह लाल मातीपासून तयार केलेले मूर्ती हे त्यांच्या कार्यशाळेचे विशेष आकर्षण आहे. शोकेसमधील बालगणेश मूर्ती वर्षभर विक्रीसाठी उपलब्ध असतात. कारखान्याची सुरुवात यावर्षी १ जूनपासून माती कामाने झाली असून, २ जुलैपासून रंगकाम जोमात सुरू आहे.
शिवलकर परिवाराच्या कलेमुळे संगमेश्वर पंचक्रोशीतील रत्नागिरी, फुनगुस, पिरंदवणे, अंतरवली, करंबेळे आदी गावांतून भक्त गणपती मूर्ती खरेदीसाठी येतात. यावर्षी १०% दरवाढ असूनही मागणी वाढतच आहे, ही त्यांच्या कलेची आणि गुणवत्तेची साक्ष देणारी बाब आहे.
सन 2021 मध्ये स्थानिक सामाजिक संस्थांनी ‘कलारत्न’ पुरस्कार देऊन श्री. ऋषिकांत शिवलकर यांचा गौरव केला. आज शिक्षकी पेशात कार्यरत असलेले त्यांचे दोन्ही पुत्र मंदार व तुषार हे कलेचा वारसा पुढे नेत आहेत.
गावात एक काळ होता, जेव्हा रंगकाम आणि मूर्तीकला हे केवळ पूरक व्यवसाय होते. परंतु, शिवलकर कुटुंबाच्या अथक परिश्रमातून आज गणेश कलेचा एक आदर्श केंद्रबिंदू तयार झाला आहे.
कोकणातली पारंपरिक कला, स्थानिक माती आणि भक्तीभाव यांची सुंदर सांगड घालणाऱ्या या चित्रकुटुंबाचे कार्य ही एक प्रेरणादायी कथा ठरते आहे.
गणेश चित्रकलेचे संवर्धन करणारे संगमेश्वरचे अनोखे चित्रकर्मी ऋषिकांत शिवलकर
