GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : जीडीपीच्या तीन टक्के खर्च संरक्षण क्षेत्रावर करण्याची गरज : हेमंत भागवत

Gramin Search
7 Views

रत्नागिरी : देशाने आगामी काळात सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) किमान तीन टक्के खर्च संरक्षण क्षेत्रावर करणे गरजेचे आहे. सध्या तो दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे, असे प्रतिपादन निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांनी  संध्याकाळी रत्नागिरीत केले. मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रौप्यमहोत्सवी देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, युद्धाकडे भावनिकदृष्ट्या न बघता अधिक डोळसपणे पाहायला हवे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने आत्मनिर्भर व्हायला हवे. ऑपरेशन सिंदूर ही युद्धाची एक झलक असून, रणभूमीवर मिळवलेल्या विजयाचा जगभर प्रचार करण्याची गरज आहे. त्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. भागवत म्हणाले की, बदलते तंत्रज्ञान विचारात घेऊन संरक्षण दलालादेखील तशी व्यवस्था उभारावी लागते. कारगिल लढाईच्या वेळी पाकच्या हवाई क्षेत्रात जायचे नाही, अशा सूचना सैन्याला सरकारकडून होत्या.

कारगिल युद्धात पाकिस्तानने अनेकदा कांगावा केला. आपण आताच्या ऑपरेशन सिंदूरमधून काय शिकलो, हे महत्त्वाचे आहे. आधुनिक व बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. रणनीतीच्या दृष्टीने चर्चा आवश्यक आहे. पाकिस्तानला चीनने ज्या प्रकारे मदत केली आहे, ती गोष्ट भारताने लक्षात ठेवून त्यांना प्रत्युत्तर देणारी शस्त्रास्त्रे विकसित केली पाहिजेत. संरक्षणमंत्रिपद योग्य व्यक्तीला देणेही महत्त्वाचे आहे. प्रमुख वक्ते अभिजित हरकरे यांनी सांगितले की, भारत संपूर्ण जगाकडे वसुधैव कुटुम्बकम् या विचाराने पाहतो. भारताने किंवा हिंदूंनी कोणत्याही देशावर आक्रमण करून तेथील संस्कृती संपवल्याचा इतिहास नाही. भारत नेहमीच विश्वबंधुत्वाच्या नजरेने पाहतो. म्हणूनच आपणही एक भारतीय आणि हिंदू म्हणून आपल्या परंपरेत असणारी मूल्ये आणि संस्कार जागतिक पटलावर आणणे गरजेचे आहे. यात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांची उदाहरणे देऊन त्यांनी हिंदू संस्कृतीचा जागर करण्याचे आवाहन केले.

रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांच्यासह रायगडमधल्या कर्जतचे श्रीराम पुरोहित यांना मुद्रित माध्यमातील, सिंधुदुर्गातले विजय गावकर यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातील आणि संदेश फडकले यांना सोशल मीडियातील उल्लेखनीय पत्रकारितेसाठी नारद पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी मंचावर अभिजित हरकरे, पुरस्कार समितीचे संयोजक डॉ. निशीथ भांडारकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक दत्ताजी सोलकर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना अरविंद कोकजे म्हणाले, की नोव्हेंबर १९६९मध्ये साप्ताहिक बलवंतमधून पत्रकारितेला सुरुवात केली. लोकसत्ता, साप्ताहिक विवेकसाठी काम केले. आता मिळालेला सन्मान हा खरा सन्मान स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार असलेल्या साप्ताहिक बलवंतचा आहे. असा पुरस्कार मिळणे दुर्मीळ असते. याबद्दल मी शतशः ऋणी आहे. संदेश फडकले यांनी सांगितले की, कोकण संस्कृती यू ट्यूब चॅनेलमार्फत कोकणातील खाद्यसंस्कृती, संस्कृती, कृषी, लोककला याची माहिती देतो. हिंदू संस्कृतीचा कोकणात जागर केला जातो. शक्ती-तुरा, नमनातून मनोरंजनासोबत प्रबोधन केले जाते. आज राष्ट्राच्या हिताची व आपल्या हिंदू संस्कृतीची माहिती प्रभावीपणे पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.

प्रास्ताविकामध्ये डॉ. भांडारकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार सोहळा भारतीय मूल्ये, सत्यनिष्ठा व राष्ट्रहितासाठी समर्पित पत्रकारितेला मान्यता देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. पत्रकारिता केवळ माहितीची वाहक नसून, राष्ट्रनिर्माणाचा एक बळकट आधारस्तंभ आहे. सत्य आणि तथ्यावर आधारित पत्रकारिता करणाऱ्या निर्भीड पत्रकारांना प्रोत्साहन देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे देवर्षी नारद पत्रकार सन्मान हे आहे. यंदा या पुरस्कारांचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून, दर वर्षी असा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आहे. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा कार्यवाह गजानन करमरकर यांनी आभार मानले. भूषण शितूत यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Total Visitor Counter

2652433
Share This Article