GRAMIN SEARCH BANNER

देवरूख-संगमेश्वर रस्त्याची चाळण; विकासाला खड्ड्यांतून कोण वाचवणार? गाव विकास समितीचा संतप्त सवाल

संगमेश्वर (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्याचा महत्त्वाचा असणारा देवरूख-संगमेश्वर रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली पाच वर्षांची गॅरेंटी खड्ड्यात गाडली गेली असून, या रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांमुळे तालुक्याचा विकासच जणू खड्ड्यात बुडाला आहे. या रस्त्यामुळे प्रवाशांचे, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि कंबरदुखीचा त्रास असलेल्यांचे हाल होत असून, गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांनाही तालुक्याच्या दुर्दशेची जाणीव होत आहे. ही परिस्थिती पाहून ‘तालुक्याच्या विकासाला या खड्ड्यातून कोण वाचवणार?’ असा संतप्त सवाल गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी उपस्थित केला आहे.

देवरुख संगमेश्वर या मुख्य रस्त्यावर असंख्य खड्डा पडले आहेत.रस्त्याला पाच वर्षाची गॅरेंटी असतानाही रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.हा रस्ता प्रशासनाने तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी हवं विकास समितीने केली आहे.याबाबत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी सोशल मीडियावर मांडलेल्या आपल्या भूमिकेतून प्रशासनासोबतच जनतेच्या मानसिकतेवरही सडकून टीका केली आहे. ते म्हणतात, “सार्वजनिक विकासावर नेहमी अक्कल देणारे काही लोक निवडणुकीत हजार-दोन हजार रुपयांना विकले जातात. ज्यांनी पैसे घेऊन मते दिली, त्यांनी या रस्त्यावरून प्रवास करताना पुढील पाच वर्षे तेच पैसे डॉक्टर आणि औषधांवर खर्च करावेत.” निवडणुकीत मोफत बस आणि देणग्या व पैशांसाठी मतदान करणाऱ्यांना आणि आपल्या गावाच्या भविष्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरुणांनाही खंडागळे यांनी धारेवर धरले आहे. तालुक्यातील मुख्य रस्ता खराब आहे आणि प्रशासन याबाबत वेळीच उपाययोजना करत नाही,प्रशासनाला या खराब झालेल्या रस्त्याचे गांभीर्य नाही का?असा सवाल ही त्यांनी केला आहे.

यापूर्वी गाव विकास समितीच्या माध्यमातून श्यामकर्ण भोपलकर यांनी दोन वेळा आंदोलन करून या रस्त्याची दुरुस्ती करून घेतली होती, पण यावेळी संपूर्ण रस्ताच खराब झाला आहे. केवळ खड्डे बुजवणे पुरेसे नसून, आता संपूर्ण रस्त्यावर नवीन थर टाकणे आवश्यक आहे. शासनातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या खड्ड्यांमुळे त्रास होत नसल्यानेच रस्त्याची दुरुस्ती वेळेवर होत नाही, असे आश्चर्य खंडागळे यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले की, प्रशासनाने लोकांच्या मागणीची वाट न पाहता हा रस्ता दुरुस्त करायला हवा, पण सुस्तावलेल्या जनतेला प्रशासन गृहीत धरत आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने उपाययोजना न झाल्यास, भविष्यात पुन्हा एकदा गाव विकास समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा सुहास खंडागळे यांनी दिला आहे.

Total Visitor Counter

2483937
Share This Article