लांजा: तालुक्यातील भडे गावचे सुपुत्र आणि भजन क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री. संजय जनार्दन सुर्वे यांचा लांजा तहसीलदार कार्यालयाच्या वतीने नुकताच यथोचित सन्मान करण्यात आला. तहसीलदार कार्यालयाने आयोजित केलेल्या सत्यनारायण पूजेनिमित्त केलेल्या भजनरूपी सेवेचे औचित्य साधून हा सत्कार करण्यात आला.
श्री. संजय सुर्वे हे अखंड कोकण आणि मुंबईसह भजन क्षेत्रात आपल्या कलेने प्रेक्षकांची मने जिंकणारे कलाकार आहेत. त्यांना खानदानी भजन क्षेत्राचा वारसा लाभला आहे. गेल्या वर्षी त्यांना आमदार राजन साळवी यांच्या हस्ते ‘भजनरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याव्यतिरिक्त, लांजा पोलीस स्टेशन आणि शिवस्वराज्य संघटना, रत्नागिरी जिल्हा (महाराष्ट्र) यांच्याकडूनही त्यांना ‘जीवन गौरव कोकणरत्न कला गौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
याच परंपरेत, तहसीलदार लांजा श्रीमती प्रियांका ढोले यांच्या हस्ते, नायब तहसीलदार श्री. गोसावी, नायब तहसीलदार श्री. भोजेसाहेब, पुरवठा अधिकारी श्री. इंगळे आणि कृषी विकास अधिकारी श्री. हांदे यांच्या उपस्थितीत श्री. सुर्वे यांना प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
या सत्काराबद्दल बोलताना श्री. संजय सुर्वे यांनी, “ही माझ्या आई-वडिलांची, कुलदैवतेची, गुरुमाऊली, ग्रामदैवत आणि रसिक मायबाप मंडळीची पुण्याई आहे,” असे नम्रपणे सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. श्री. संजय सुर्वे हे लांजा तालुका भजन मंडळाचे विद्यमान अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.