रिवॉर्ड पॉईंट स्थानिक दुकाने अथवा मॉल्समधील खरेदीसाठी उपयुक्त ठरणार
चिपळूण : शहरात घनकचरा संकलनात वाढ व्हावी म्हणून पालिकेने गार्बेज रिवॉर्ड ही अभिनव योजना सुरू केली आहे. या उपक्रमाची सुरुवात मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केली. या योजनेंतर्गत नागरिकांनी अधिकाधिक वर्गीकृत कचरा घंटागाडीमध्ये देऊन रिवॉर्ड पॉईंट मिळवायचे आहेत. त्या द्वारे ग्राहकांना दुकानांतील खरेदीवर लाभ मिळणार आहे.
चिपळूण पालिकेच्या गार्बेज रिवॉर्ड उपक्रमांतर्गत नागरिकांनी दररोज कचरा दिल्यास तसेच घंटागाडी कर्मचाऱ्याने कचरा संकलित करून मालमत्तांवर लावलेला स्कॅनिफाय कोडचे स्कॅनिंग केल्यास संबंधिताला रिवॉर्ड पाईंट्स मिळतील. हे रिवॉर्ड पॉईंट स्थानिक आस्थापने, दुकाने अथवा मॉल्समधील खरेदीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. त्या द्वारे आकर्षक व भरघोस सवलतींचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एका खासगी कंपनीद्वारे करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. नागरिक आपले रिवॉर्ड पॉइंट केवळ स्थानिक दुकाने, आऊटलेट किंवा मॉल्समध्येच केलेल्या खरेदीवर मिळवू शकतील. त्यामुळे स्थानिक उद्योगांना अधिकाधिक ग्राहकविना कुठल्या जाहिरातीशिवाय प्राप्त होणार आहेत. यामध्ये उद्योगांची यादीही निश्चित केली आहे. ती यादी पालिकेकडे उपलब्ध आहे. उद्योजकांची यादी तयार करण्यासाठी तसेच नागरिक व सफाई कर्मचाऱ्यांचा या उपक्रमाला संपूर्ण पाठिंबा मिळावा, यासाठी नगरपालिकेकडून आवाहनही करण्यात आले आहे.
या योजनेमध्ये मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक रोहित खाडे, आरोग्यविभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, वाहनप्रमुख संतोष शिंदे, प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर आर. के. सिन्हा या उपक्रमामध्ये यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
चिपळूण नगर परिषदेची नागरिकांसाठी अनोखी योजना ; कचरा संकलन करा – अन् बक्षीस मिळवा
