संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तळेकांटे पोस्ट ऑफिसजवळ ०३ जुलै २०२५ रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. अज्ञात वाहनचालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या या तरुणाच्या दोन्ही पायांवरून गाडी घालून त्याला जखमी केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी लाड बेसरा (वय ३२, रा. घोडलेगी पंचायत चांदिल, सेराकेला-खरसन, झारखंड) हा मुंबई-गोवा महामार्गावरील एका रस्त्याच्या कामावर होता. काम संपल्यानंतर त्याने दारू प्राशन केली आणि रस्त्याच्या साईडपट्टीच्या बाहेर पडला होता. याच वेळी एका अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिवेगाने चालवत, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेसरा याच्या दोन्ही पायांवरून गाडी घातली. या अपघातात बेसरा याला गंभीर दुखापती झाल्या आहेत.
अपघात घडल्यानंतरही अज्ञात वाहनचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला.
याप्रकरणी विनय वसंत मनवल (वय ३७, रा. संगमेश्वर) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर पोलीस अज्ञात वाहनचालकाचा शोध घेत आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर तळेकांटे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण गंभीर जखमी; चालकाविरोधात गुन्हा
