मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
राजापूर/तुषार पाचलकर – ओणी-अनुस्कुरा मार्गावरील रायपाटणच्या खिंडीत (ता. राजापूर) काल, गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघाताने मोकाट गुरांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रस्त्यावर आलेल्या असंख्य म्हशी आडव्या आल्याने दुचाकीवरून जात असलेले रायपाटणचे रहिवासी रामदास गांगण व सुहास गांगण हे अपघातग्रस्त झाले. या अपघातात दोघांच्याही हाताची हाडे फ्रॅक्चर झाली असून, त्यांच्यावर सिंधुदुर्ग येथील पडवे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेनऊच्या दरम्यान रामदास गांगण आणि सुहास गांगण हे दोघे दुचाकीवरून ओणी-अनुस्कुरा मार्गाने जात होते. रायपाटणच्या खिंडीत रस्त्यावर अचानक असंख्य म्हशी आडव्या आल्याने त्यांना काही कळायच्या आतच दुचाकीवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि त्यांचा अपघात झाला. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या हाताची हाडे फ्रॅक्चर झाली आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक युवकांनी तात्काळ धाव घेतली. समीर खानविलकर, मया गांगण, सुशांत गांगण, विशाल गांगण आणि तुषार गांगण या युवकांनी कोणतीही वेळ न दवडता जखमींना तात्काळ उपचारासाठी सिंधुदुर्ग येथील पडवे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यामुळे दोघांवर त्वरित उपचार सुरू होऊ शकले.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
वास्तविक पाहता, या मार्गावर आणि अन्य ठिकाणीही मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे लहान-मोठे अपघात सातत्याने होत असून जीवित आणि वित्तहानी होत आहे. मोकाट गुरांना आवर घालण्याबाबत वारंवार जनजागृती होऊन, अपघाताच्या घटना समोर येऊनही प्रशासन यावर कोणतीही ठोस भूमिका का घेत नाही, असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
रायपाटणच्या खिंडीतील या ताज्या अपघातामुळे दोन निरपराध व्यक्तींना मोठी दुखापत झाली आहे. केवळ नशिब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. मात्र, रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांवर त्वरित उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठे अपघात होऊन मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन मोकाट गुरांच्या मालकांवर कठोर कारवाई करावी आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व अपघातग्रस्तांचे कुटुंबीय करत आहेत.