१,४६,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
देवरुख (प्रतिनिधी) – देवरुख परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन तरुणांना देवरुख पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी बंदूक, जिवंत काडतूस, बॅटरी आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याच आदेशानुसार, देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डीवायएसपी लांजा सुरेश कदम यांच्या सूचनेनुसार रात्रीच्या वेळी मौजे विघ्रवली-सोनवडे रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिषेक वेलणकर आणि सचिन कामेरकर यांना संशयित हालचाली दिसून आल्या.
रात्रीच्या वेळी दोन तरुण डोक्याला बॅटरी लावून संशयास्पदरीत्या फिरत होते. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे संशय बळावला आणि पोलिसांनी त्यांची अधिक तपासणी केली. यावेळी एका तरुणाजवळ जिवंत काडतूस आणि गावठी बंदूक आढळून आली.
या प्रकरणी पोलिसांनी प्रितेश प्रतिपाल आडावं (वय २६, रा. कांजीवरा, देवरुख) आणि साहिल संतोष कदम (वय १९, रा. ओझरे बौध्दवाडी) या दोन तरुणांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात ते वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने फिरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कारवाईत पोलिसांनी गावठी बनावटीची बंदूक, विविध कंपन्यांची जिवंत काडतुसे, दोन बॅटऱ्या आणि एम.एच.०८/बी.एच./५०७५ क्रमांकाची ज्युपिटर कंपनीची दुचाकी जप्त केली आहे. या दोन्ही आरोपींवर भारतीय हत्यार अधिनियम १९५९ चे कलम ३ (१)/२५ आणि बी.एन.एस. २०२३ चे कलम ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.