देवरुख (प्रतिनिधी): हरपुडे गावामध्ये जल जीवन मिशन योजना गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली आहे. या योजनेबद्दल प्रश्न विचारणारे रहिवासी महेंद्र घुग यांना माजी सरपंचांनी आणि त्यांच्या पतीने अरेरावीची भाषा करत एकटा भेट तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित महेंद्र घुग यांनी देवरुख पोलीस ठाण्यात संतोष गुरव आणि संजीवनी गुरव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार 351(2) व 3(5) या कलमाखाली अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
हरपुडे गावात प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी पुरवण्याच्या उद्देशाने शासनाकडून जल जीवन मिशन योजनेला मंजुरी मिळाली होती. मात्र, ही योजना मागील तीन वर्षांपासून रखडलेली असून, कामाच्या सुरुवातीपासूनच यात अनेक अनियमितता असल्याचा आरोपही गावातील काही नागरिकांनी केला होता. त्यामुळे ही योजना मध्येच थांबली होती. त्यानंतर, नवीन निविदा काढून कामाला पुन्हा सुरुवात झाली, परंतु काम अजूनही अर्धवट अवस्थेतच आहे. या गंभीर समस्येमुळे गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, तक्रारदार आणि त्यांचे सहकारी प्रशांत घुग यांनी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीकडून आवश्यक असलेले संमतीपत्र अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे काम थांबले आहे.
या माहितीनंतर, तक्रारदाराने ग्रामपंचायतीच्या सदस्यांना आणि सध्याच्या व मागील सरपंचांना यावर स्पष्टीकरण देण्याची विनंती केली. त्यांनी सोशल मीडियावर एक संदेश लिहून, गावातील नागरिकांना पाणी का मिळत नाही आणि योजना का रखडली, याबद्दल माहिती देण्याची मागणी केली. या प्रश्नामुळे, माजी सरपंच संजीवनी गुरव आणि त्यांचे पती संतोष गुरव यांनी महेंद्र घुग यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना अरेरावी करत बघून घेण्याची धमकी दिली असल्याचे महेंद्र घुग यांनी म्हटले आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आज संजीवनी गुरव आणि संतोष गुरव यांनी त्यांच्या देवरुख येथील कार्यालयात येऊन, संतोष गुरव यांनी ‘बाहेर बघून घेऊ’ अशीही धमकी घुग यांना दिली.
महेंद्र घुग यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली असून त्यांनी आपल्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना पुरावा म्हणून तपासण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. गावाच्या विकासासाठी आणलेल्या एका महत्त्वाच्या योजनेवर प्रश्न विचारल्याने धमकी दिल्याचा हा प्रकार सध्या देवरुख तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.