GRAMIN SEARCH BANNER

वीज यंत्रणेचे ‘एआय’ आधारित डिजिटायझेशन; महावितरण व ‘जीईएपीपी’मध्ये सामंजस्य करार

Gramin Varta
48 Views

वीज वितरण यंत्रणेच्या कार्यक्षमतेच्या वाढीसह विविध फायदे

मुंबई: वीज वितरण यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपकेंद्र, वीजवाहिन्या, रोहित्र आदींचे आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच्या आधारे डिजिटायझेशन करण्यासाठी महावितरण आणि ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट (जीईएपीपी, भारत) कंपनी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र आणि ‘जीईएपीपी’चे उपाध्यक्ष (भारत) श्री. सौरभ कुमार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून महावितरणची कार्यक्षमता वाढविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वीज यंत्रणेचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. वीज क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा नवा मानदंड ठरणाऱ्या या डिजिटायझेशनसाठी मुंबई येथील सांघिक कार्यालयात मंगळवारी (दि. ७) सामंजस्य करार झाला. यावेळी महावितरणचे संचालक (संचालन/प्रकल्प) श्री. सचिन तालेवार, संचालक (वाणिज्य) श्री. योगेश गडकरी, कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर यांची उपस्थिती होती.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सांगितले की, डिजिटायझेशनच्या माध्यमातून वीज यंत्रणेच्या व्यवस्थापनात आणखी अचूकता येईल. त्याआधारे महावितरणची आर्थिक व वीजहानी कमी करण्यासोबतच ग्राहकांना तत्पर व दर्जेदार वीजपुरवठा करता येईल. यासह हरित ऊर्जेचा वापर व वीज यंत्रणेचे जाळे भक्कम करण्यासाठीही हे डिजिटायझेशन अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. यावेळी ‘जीईएपीपी’चे उपाध्यक्ष श्री. सौरभ कुमार म्हणाले की, महावितरणच्या वीज यंत्रणेचे डिजिटायझेशन व त्या माध्यमातून मिळणारे विविध फायदे देशातील इतर वीज कंपन्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

या सामंजस्य करारानुसार ‘जीईएपीपी’कडून महावितरणच्या राज्यभरातील वीज वितरण यंत्रणेच्या डिजिटायझेशनसाठी आर्टिफिशिअल इंटिलिजन्स व मशीन लर्निंगचा आधार घेतला जाणार आहे. या डिजिटायझेशनमुळे वीज वितरणाच्या सर्व यंत्रणेचे व्यवस्थापन आणखी अचूक होईल. वीजहानी कमी होईल. वीज खरेदीची संभाव्य अचूक गरज कळेल. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीबाबत तसेच भार व्यवस्थापन किंवा अतिभारित यंत्रणा आदींबाबत रिअल टाइम विश्लेषणात्मक माहिती उपलब्ध होणार आहे. त्याआधारे दर्जेदार वीजसेवा व वीजपुरवठ्यासाठी आणखी प्रभावीपणे यंत्रणेचे व्यवस्थापन करता येणार आहे.

Total Visitor Counter

2650995
Share This Article