रत्नागिरी/ प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी धक्कादायक बाब समोर आली आहे.
एका खुनाचा तपास उलगडत असताना दुर्वास पाटील या नराधमाने एक, दोन नव्हे तर तब्बल चार खून केल्याचे समोर आले आहे. पहिला खून – सीताराम वीर (50, वाटद-खंडाळा), दुसरा खून – राकेश जंगम (28, वाटद,खंडाळा), तिसरा खून भक्ती मयेकर आणि चौथा तिच्या पोटातील निष्पाप बाळाचा खून झाल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे. तीन खुनाची अधिकृत माहिती समोर आल्यावर चौथा खून भक्तीच्या गर्भातील बाळाचा झाल्याची माहिती समोर येत आहे.या काळजाला पिळवटून टाकणाऱ्या उघडकीने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
पहिला खून – सीताराम वीर (50, वाटद-खंडाळा)
सीताराम वीर हे दुर्वास पाटील याच्या सायली बारमध्ये कामाला होते. कामाच्या वादातून त्यांना दुर्वास याने जबर मारहाण केली. आणि या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. मात्र याचा कुणालाही थांगपत्ता लागू दिला नाही. त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
दुसरा खून – राकेश जंगम (28, वाटद,खंडाळा)
राकेश याला सीताराम वीर यांच्या खुनाची माहिती होती. राकेशने घरी आईला सांगितले होते – 6 जून 2024 रोजी तो “कपड्याची बॅग आणायला जातो”, असे सांगून घरातून गेला होता. पण तो कधी परतलाच नाही. आईने तो बेपत्ता असल्याची फिर्याद जयगड पोलिस ठाण्यात दिली होती. राकेश याला आपण “कोल्हापूरला जातो” असा खोटा बहाणा करून दुर्वास पाटील आणि नीलेश भिंगार्डे यांनी आंबाघाटात खून करून त्याचा मृतदेह टाकून दिला. एक वर्षभर बेपत्ता राहिल्याने गुन्हेगार दुर्वास निर्धास्त झाला होता.
तिसरा खून – भक्ती मयेकर ( 26, मिरजोळे)
यानंतर दुर्वासच्या डोक्यात भक्ती मयेकरला मारण्याचा प्लॅन शिजत होता. आंबा घाट हे निर्जन स्थळ असल्याने या ठिकाणी मृतदेह टाकल्यास सापडणार नाही अशी त्याला खात्री होती. त्याप्रमाणे भक्तीचा ही बारमध्ये दोरीने गळा आवळून खून केला आणि मृतदेह आंबाघाटात रात्रीच्या वेळी फेकून दिला. दहा दिवस मृतदेह कुजत पडला, आणि दुर्वास निश्चिंतपणे फिरत राहिला. मात्र, या वेळी भक्तीच्या भावाने आवाज उठवला आणि पोलिसांत तक्रार दिल्यानंतर संशयाची सुई थेट दुर्वासवर गेली.
चौथा खून – भक्तीच्या गर्भातील बाळ!
भक्ती मयेकर गर्भवती असल्याने या क्रूर खुनात एका निष्पाप जीवाचाही अंत झाला. हे उघड होताच जिल्हा सुन्न झाला.
भक्तीच्या खुनानंतर संशयावरून पोलिसांनी दुर्वास पाटीलला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत विश्वास पवार व निलेश भिंगार्डे यांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौकशीत दुर्वासने एकामागोमाग एक खुनांची कबुली दिली आणि त्याच्या डोक्यातील रक्तरंजित किनार सर्वांसमोर आली.
गणेशोत्सवाच्या आनंदमयी वातावरणात घडलेल्या या खुनांनी रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. एकाच नराधमाने चार निर्दयी खून करून मानवतेलाच काळीमा फासल्याने सर्वत्र प्रचंड संताप व्यक्त होत आहे.