रत्नागिरी: जिल्ह्यातील चार तालुक्यांतील दहा ठिकाणचे पाणी पिण्यासाठी दूषित असल्याचे धक्कादायक वास्तव जिल्हा परिषदेच्या पाणी गुणवत्ता तपासणी अहवालातून समोर आले आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे फेब्रुवारी महिन्यात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ३३६ पाणी नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये २.९८ टक्के नमुने दूषित आढळले आहेत. विशेषतः चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील काही विहिरी व हातपंपांचे पाणी आरोग्यास अपायकारक असल्याचे निष्पन्न झाल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यात सर्वाधिक ६ ठिकाणी, तर गुहागरमध्ये ३ ठिकाणी दूषित पाण्याचे नमुने आढळले आहेत. दापोली तालुक्यात घेतलेल्या ८६ नमुन्यांपैकी १ नमुना दूषित निघाला असून त्याची टक्केवारी १.१६ इतकी आहे, तर चिपळूणमध्ये हेच प्रमाण ३.८२ टक्के आणि गुहागरमध्ये ३.३७ टक्के नोंदवण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर अशा दोन टप्प्यात केल्या जाणाऱ्या या सर्वेक्षणामुळे सार्वजनिक जलस्रोतांची गुणवत्ता समोर येते. फेब्रुवारी महिन्यात ग्रामपंचायतींचे जलसुरक्षक, आरोग्य सेवक आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामार्फत ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, याच काळात मंडणगड, खेड, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांतील पाणी नमुन्यांची तपासणी झाली नसल्याची बाबही अहवालात नमूद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील जलस्रोतांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जोखमीनुसार ग्रामपंचायतींचे वर्गीकरण करून त्यांना विविध रंगांची कार्डे वितरित केली जातात. ज्या ग्रामपंचायतींची ७० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या तीव्र जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून आहे, त्यांना लाल कार्ड दिले जाते, तर सुरक्षित स्रोत असलेल्या गावांना हिरवे कार्ड मिळते. सलग पाच वर्षे साथरोगांचा प्रादुर्भाव न झाल्यास आणि सातत्याने हिरवे कार्ड राखल्यास संबंधित ग्रामपंचायतीला चंदेरी कार्ड देऊन गौरविण्यात येते. सद्यस्थितीत दूषित पाणी आढळलेल्या तालुक्यांतील हातपंप आणि विहिरींचे पाणी पिणे म्हणजे एकप्रकारे धोक्याची घंटा असून, नागरिकांनी पाणी उकळून व गाळून पिणे आवश्यक बनले आहे.






