GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: बेनगी, आडीवरे परिसरात वणव्यात आंबा-काजू बागा जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान

Gramin Varta
186 Views

राजापूर: तालुक्यातील बेनगी आणि आडीवरे परिसरातील सड्यावर बुधवारी दुपारी भीषण वणवा लागल्याची घटना घडली. दुपारच्या रखरखत्या उन्हात भडकलेल्या या आगीला वाऱ्याची जोड मिळाल्याने वणव्याने रौद्र रूप धारण केले होते. या आगीत फळांनी लगडलेली आंबा आणि काजूची शेकडो कलमे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुपारी अचानक लागलेल्या या आगीची माहिती मिळताच बागायतदारांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने स्थानिक पातळीवरील प्रयत्न अपुरे पडत होते. अखेर राजापूर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून सुमारे साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हा वणवा आटोक्यात आणला.

या आगीत केवळ फळबागाच नव्हे, तर सड्यावरील गुरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त असलेले गवतही पूर्णपणे जळून गेले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी स्वप्नील गराटे यांनी परिसराची पाहणी केली असून, वणव्यात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनंतर नोव्हेंबर-डिसेंबरपासून ते उन्हाळ्यापर्यंत वणवा लागण्याचे सत्र सातत्याने सुरू असून, यामध्ये शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून वाढवलेल्या बागा डोळ्यादेखत खाक होत आहेत. वारंवार घडणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे राजापूर तालुक्यातील बागायतदार आणि शेतकरी वर्गातून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3380005
Share This Article