रत्नागिरी : कळझोंडी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत वाटद-खंडाळा येथे येऊ घातलेल्या एमआयडीसी प्रकल्पाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवला. सरपंच दिप्ती दीपक वीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत तब्बल ९० टक्के ग्रामस्थांनी “प्रकल्प नको” असा ठाम पवित्रा घेतला.
जिंदल कंपनीच्या प्रकल्पामुळे परिसरात झालेले दुष्परिणाम लक्षात घेऊन ग्रामस्थांनी नव्या एमआयडीसीविषयी गंभीर शंका मांडल्या. प्रकल्पाचे फायदे-तोटे, रोजगाराची हमी आणि स्थानिकांसाठी सुविधा याबाबत अधिकृत माहिती मिळेपर्यंत कोणतीही परवानगी न देण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. तसेच संबंधित अधिकारी आणि पर्यावरण तज्ज्ञांनी थेट ग्रामसभेत हजेरी लावून माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, सरपंच दिप्ती वीर यांनी ११ ऑगस्ट रोजी एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या “प्रकल्पांचे फायदे घ्या” या बातमीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्या बातमीतील फोटो व विधान चुकीचे असल्याचा खुलासा करत ग्रामस्थांनी खोटी माहिती प्रसारित करणाऱ्याची चौकशी करण्याची मागणी केली.
संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी जयगड पोलिसांनी सभास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. या सभेला उपसरपंच प्रकाश पवार, ग्रामविकास अधिकारी अमोल केदारी, तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप पवार, तसेच २२६ ग्रामस्थ हजर होते. यावेळी विविध समित्या स्थापन करून अर्ज व परिपत्रकांचे वाचनही करण्यात आले.
रत्नागिरी : कळझोंडी ग्रामसभेत वाटद एमआयडीसीला ९०% ग्रामस्थांचा कडाडून विरोध
