राजापूर : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस आधारकार्ड आणि बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी फिर्यादीची फसवणूक केल्याबद्दल पाच जणांवर राजापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९ सप्टेंबर २०२३ रोजी घडली होती, मात्र याप्रकरणी २६ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी उमेश दत्तु पाटील (वय ५३, रा. कोगनोळी, ता. निपाणी, जि. बेळगाव) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून चवगोंडा आण्णासो पाटील (रा. चिंचवाड, ता. करवीर, जि. कोल्हापूर), फत्तेसींह दत्तात्रय चव्हाण (वय ७५, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर), पद्मजा प्रकाश लेंगडे (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), प्रशांत पाटील आणि त्याची पत्नी (दोघे रा. शहापुरी, कोल्हापूर) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चवगोंडा आण्णासो पाटील याने राजापूर दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस आधारकार्ड सादर केले. तसेच खोट्या सह्या करून आणि बोगस खरेदीखत तयार करून जमिनीचा व्यवहार केला. यासाठी त्याला फत्तेसींह चव्हाण, पद्मजा लेंगडे, प्रशांत पाटील आणि त्याच्या पत्नीने साथ दिली. या सर्वांनी संगनमत करून संबंधित जमीन चवगोंडा पाटील याच्या नावावर करून घेत फिर्यादी उमेश पाटील यांची फसवणूक केली. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या (IPC) कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
राजापुरात बोगस कागदपत्रांच्या आधारे जमिनीचा व्यवहार; कोल्हापुरातील पाच जणांवर गुन्हा






