लांजा : कोकणच्या मातीतील खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा राज्यस्तरावर लांजा तालुक्याचा नावलौकिक उंचावला आहे. विरार येथे २८ आणि २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या ‘व्हिक्टरी क्लब ६ वी महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वॉंदो चॅम्पियनशिप २०२६’ या भव्य स्पर्धेमध्ये लांजा येथील गुरुकुल तायक्वॉंदो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली.
प्रशिक्षिका शितल विरेंद्र आचरेकर यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या खेळाडूंनी अत्यंत चुरशीच्या लढतीत सुवर्ण आणि कांस्य पदकावर आपले नाव कोरले. यामध्ये विघ्नेश विनोद दिवाळे याने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर सुवर्णपदक जिंकत अव्वल स्थान गाठले, तर आराध्य कमलाकर सावंत याने अत्यंत जिद्दीने खेळत कांस्यपदक मिळवून यश संपादन केले.
या खेळाडूंच्या दैदीप्यमान यशामुळे संपूर्ण लांजा तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश कर्रा, सचिव लक्ष्मण कर्रा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी यांनी विजेत्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच लांजा अकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव, मार्गदर्शक परशुराम मासये, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे यांच्यासह राष्ट्रीय पंच तेजस्विनी आचरेकर, प्रमुख प्रशिक्षक तेजस पावसकर, गौरव खेडकर, गणेश तोंडारे, तेजस वडवलकर आणि योगेश तोंडारे यांनी खेळाडूंच्या या यशाचा गौरव केला. ग्रामीण भागातील मुलांनी क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर मिळवलेली ही झेप लांजा तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जात असून, सर्व स्तरांतून खेळाडू व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले जात आहे.






