रत्नागिरी: तालुक्यातील जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिवरी बंदर वरवडे येथे एका ८५ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. सूर्यकांत सखाराम राणे असे मृत वृद्धाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सेवानिवृत्त असलेले राणे हे तिवरी येथील आपल्या घरी एकटेच राहत होते. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते सातच्या सुमारास त्यांनी घराच्या पडवीतील लोखंडी चॅनेलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.
घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल करण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, १७ एप्रिल रोजी रात्री उशिरा या घटनेची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे. वृद्धपकाळात एकटेपणामुळे किंवा अन्य कोणत्या कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, याचा अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत. या घटनेने वरवडे परिसरात शोककळा पसरली आहे.





