GRAMIN SEARCH BANNER

लांजा शिकार प्रकरण : बेकायदेशीर बंदूक बनवणाऱ्या मास्टरमाईंडच्या आवळल्या मुसक्या

Gramin Varta
275 Views

लांजा: राजापूर तालुक्यातील पाचल येथील एका इसमाने शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना बंदूक बनवून दिल्याचा खळबळजनक प्रकार लांजा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. देवराई परिसरात शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या दोन संशयितांना अटक केल्यानंतर, तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी या बेकायदेशीर शस्त्राचा मुख्य निर्माता अनिल सीताराम गुरव (वय ४३, रा. तळवडे-पाचल) याला जेरबंद केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या कारवाईमुळे विनापरवाना शस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या गुन्ह्याची मुळे देवराई येथील शिकारीच्या प्रयत्नात दडली होती. बुधवारी पोलिसांनी अरुण नारायण चौगुले आणि शैलेश दिलीप मेस्त्री या दोघांना शिकारीसाठी लपून बसलेले असताना रंगेहात पकडले होते. त्यांच्या झडतीत १२ बोअरची एक बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. मात्र, अटकेतील अरुण चौगुले याच्याकडे या शस्त्राचे कोणतेही अधिकृत परवाने नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या सखोल चौकशीत ही बंदूक राजापूरच्या पाचल येथील अनिल गुरव याने तयार करून दिल्याची कबुली आरोपींनी दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शस्त्र निर्मात्याच्या दिशेने आपला तपास वळवला.

लांजा पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आमोद सरंगले, हेडकॉन्स्टेबल विलास जाधव, सुयोग वाडकर आणि नितेश राणे यांच्या पथकाने शुक्रवारी पाचल-तळवडे परिसरात सापळा रचला. संशयित अनिल गुरव याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने बेकायदेशीररीत्या बंदूक बनवून दिल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला रीतसर अटक केली. केवळ शिकारी पकडून न थांबता, शस्त्राच्या मूळ स्त्रोतापर्यंत पोहोचल्याबद्दल लांजा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आमोद सरंगले हे करत आहेत.

Total Visitor Counter

3300996
Share This Article