GRAMIN SEARCH BANNER

शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीकडून बारा किल्ल्यांची भव्य प्रतिकृती साकारून सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे

Gramin Varta
27 Views

शिवदुर्ग; किल्ला, नाणी व शस्त्रास्त्र प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवकालीन वैभव; शिवदुर्ग’ प्रदर्शनाने अनेकांचे लक्ष वेधले

मुंबई | सुजित धाडवे : शैलेन्द्र एज्युकेशन सोसायटीच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज दहिसर पूर्व येथे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे शहाण्णव व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘शिवदुर्ग’ या ऐतिहासिक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेकांनी भेट दिली. महाविद्यालयाच्या परिसरात बारा ऐतिहासिक किल्ल्यांच्या भव्य प्रतिकृती, दुर्मीळ नाण्यांचे संकलन, पारंपरिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि माहितीपर फलक यांच्या माध्यमातून मराठा साम्राज्याचा वैभवशाली इतिहास जिवंत करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, उपमहापौर संजय घाडी, स्थायी समिती सदस्य व नगरसेवक प्रकाश दरेकर, गटनेते गणेश खणकर, नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर, नगरसेविका दीक्षा कारकर, माजी नगरसेवक न्याय व महसूल समिती अध्यक्ष हर्षद कारकर, माजी नगरसेविका संजना घाडी, माजी नगरसेवक जगदीश ओझा, राणी द्विवेदी, जितेंद्र पटेल, अभिनेत्री संध्या म्हात्रे, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जी. एस. पांडलोसकर, उपकार्याध्यक्ष पंकज बाडकर, सचिव आशिष गिरप, कोषाध्यक्ष प्रसाद वालावलकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रदर्शनाचे कौतुक करून शैक्षणिक संस्थेच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले.

या ऐतिहासिक समूहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी लष्करी रणनीतीचे प्रतीक असलेले बारा किल्ले समाविष्ट आहेत. त्यापैकी आकरा किल्ले महाराष्ट्रात — रायगड, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, साल्हेर, लोहगड, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी — तर तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. या किल्ल्यांच्या स्थापत्यवैभवातून आणि भौगोलिक रणनीतीतून छत्रपती शिवाजी महाराजांची अद्वितीय लष्करी दृष्टी अधोरेखित होते.

यंदाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे शहाण्णव व्या जयंतीनिमित्त तसेच शैलेन्द्र एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालय परिसरात ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती, दुर्मीळ नाण्यांचे संकलन, पारंपरिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि माहितीपर फलक यांची प्रभावी मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ऐतिहासिक वेशभूषा, मार्गदर्शक सादरीकरणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या ऐतिहासिक सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

  ” विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाचे कौतुक केले. “मराठा साम्राज्याच्या किल्ल्यांचा जागतिक पातळीवर झालेला गौरव हा प्रत्येक महाराष्ट्रवासीयासाठी अभिमानाची बाब आहे. इतिहास जतन करण्याची जबाबदारी ही नव्या पिढीने स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता व अभिमान निर्माण होतो.”बृहन्मुंबई महानगरपालिका, महापौर, रितू तावडे

“शिक्षणासोबत इतिहास, संस्कृती आणि वारसा यांची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे ही आमची बांधिलकी आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात अशा उपक्रमांद्वारे समाजात ऐतिहासिक अभिमानाची भावना दृढ करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ” – शैलेंद्र महाविद्यालय , प्राचार्या, डॉ. स्वाती पितळे

  ” नवीन पिढी ने फक्त पुस्तकातून नव्हे तर अनुभवातून इतिहास आत्मसात करावे ह्या संकल्पनेतून त्यांच्यामार्फत किल्ले बनवले गेले. सर्वसामान्य नागरिक जर इतिहासापर्यंत पोहोचू शकत नसतील तर इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे ही काळाची गरज आहे.  “ – इतिहास विभाग प्रमुख, प्रा. आदित्य धर्मेंद्र धायफुले

Total Visitor Counter

3387368
Share This Article