GRAMIN SEARCH BANNER

५ डिसेंबरचे शाळा बंद आंदोलन यशस्वी करा; खेड तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांचे शिक्षकांना आवाहन

Gramin Varta
208 Views

खेड: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलन आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावरील महामोर्चात खेड तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी खंबीरपणे सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केले आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता तसेच अफवांवर विश्वास न ठेवता आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शाळा बंद आंदोलनासंदर्भात तालुका स्कूल, खेड येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडच्या सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना चव्हाण यांनी शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांवर लक्ष केंद्रित केले.

या मागण्यांमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत टीईटी (TET) संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणे, १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करणे, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षण सेवक पद रद्द करणे आणि प्राथमिक शिक्षकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे दहा-वीस-तीस वर्षांची आश्वासित प्रगती योजना (ACP) लागू करणे इत्यादींचा समावेश आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत शिक्षकांचा संघर्ष सुरू राहील, असा निर्धार चव्हाण यांनी व्यक्त केला.

या महत्त्वाच्या सभेला सचिव धर्मपाल तांबे, शिक्षक पतपेढी संचालक सुनील दळवी, ज्येष्ठ सल्लागार व पतपेढीचे माजी अध्यक्ष सुनील सावंत, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर, दिलीप यादव, सल्लागार संजय गडाळे, एनपीएस प्रतिनिधी येडू केकान, सुनील वाघमारे, राजाराम दरेकर, उदय रेडीज आदी सभासद उपस्थित होते.

Total Visitor Counter

3206086
Share This Article