गणेशगुळे किनाऱ्यावर दुर्मिळ ‘फिनलेस पॉरपॉईज’ मृतावस्थेत आढळला

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर दुर्मिळ समजला जाणारा इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज हा सागरी सस्तन प्राणी मृतावस्थेत आढळून आला. डॉल्फिनसारखा दिसणारा हा प्राणी किनाऱ्यावर वाहून आल्याने परिसरात दुर्गंध पसरला होता. मात्र तो नेमका कशामुळे मृत पावला, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, संध्याकाळी भरतीच्या वेळी आलेल्या जोरदार लाटांमुळे हा मृत प्राणी पुन्हा समुद्रात वाहून गेला.

‘नेओफोकेना फोकेनोइड्स’ या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा हा प्राणी सामान्य भाषेत डॉल्फिन किंवा डुकरा मासा म्हणूनही ओळखला जातो. मात्र पॉरपॉईज आणि डॉल्फिनमध्ये स्पष्ट फरक असून या प्राण्याला लांब चोच नसते, डोके गोलाकार असते आणि पाठीवर पर नसल्याने त्याला ‘फिनलेस पॉरपॉईज’ असे म्हटले जाते. हा प्राणी मुख्यतः हिंदी महासागर आणि पश्चिम पॅसिफिक महासागर परिसरात आढळतो. त्याची लांबी साधारण दीड ते दोन मीटरपर्यंत असते.

मासे आणि लहान सागरी जीव हे त्याचे मुख्य खाद्य असून प्रदूषण, मासेमारीच्या जाळ्यात अडकणे आणि किनारी अधिवास नष्ट होणे यामुळे या प्रजातीसमोर मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्राणी संरक्षित आणि असुरक्षित श्रेणीत मोडणारा मानला जातो.

समुद्रकिनाऱ्यावर मृत अवस्थेत आढळलेल्या या प्राण्याच्या शरीरातून कुजण्यास सुरुवात झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. स्थानिकांमध्येही याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

“इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज हा किनारी परिसंस्थेच्या आरोग्याचा महत्त्वाचा सूचक मानला जातो. त्यांची उपस्थिती सागरी अधिवास आणि खाड्यांच्या स्थिरतेचे संकेत देते. प्रदूषण, मानवी हस्तक्षेप आणि अन्नसाखळीतील बदलांचा परिणाम या प्राण्यांवर लवकर दिसून येतो. त्यामुळे या प्रजातीचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे,” असे मत डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी व्यक्त केले

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *