GRAMIN SEARCH BANNER

जागांच्या नकाशांसाठी शेतकरी,नागरिक झिजवतायत जोडे

Gramin Varta
17 Views

दापोलीत भूमी अभिलेख कार्यालयाचा संतापजनक कारभार

महसूल राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भुमिअभिलेख कार्यालयाचा संतापजनक कारभार

दापोली : गतिमान शासन..शासन तुमच्या दारी… महाराजस्व अभियान असे लोकाभिमुख कार्यक्रम महसूल खाते राबवत आहे. या सगळ्याला महसूल राज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्या मतदारसंघातीलच दापोली तालुका भूमि अभिलेख कार्यालयाने मात्र अक्षरशः हरताळ फासला आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याच मतदारसंघातील दापोली तालुका भूमि अभिलेख कार्यालयाचा कारभार अक्षरशः रामभरोसे सुरूआहे. या कार्यालयाच्या अस्ताव्यस्त संतापजनक कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ठिकाणी आपल्या जागेचा मोजणी नकाशा मिळेल या अशाने सर्वसामान्य नागरिक ,शेतकरी अक्षरशः सहा सहा महिने वर्षभर या कार्यालयात खेटे मारून जोडे झिजवत आहेत. मात्र या कार्यालयातील अधीक्षकसाहेबांना या सगळ्याशी काहीही देणेघणे नाही. तुम्हाला काय करायचे ते करा… माझी कोणाकडे तक्रार करायची आहे ती करा अशा स्वरूपाची उर्मट उत्तर सर्वसामान्य नागरिकांना दिली जात आहेत. नकाशा मिळण्यासाठी अर्ज करूनही तब्बल सहा सहा महिने वर्षभर झाल्यानंतरही नकाशे सापडत नसल्याचे उत्तर दिली जात आहेत,मात्र याच नकाशासाठी कागदावर वजन ठेवल्यावर मात्र जागेचा नकाशा उपलब्ध होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे या कार्यालयातील नकाशासाठी मोजणीसाठी वजनदार कामांची चर्चा रंगली आहे. या कार्यालयाच्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दापोली तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील अनेक प्रकरणांचे नकाशे गहाळ झाले असून हे नकाशे स्कॅनिंग साठी एकत्र केल्याचे उत्तर दिले जात आहे. अनेक बिनशेती मोजणी प्रकरणांचे नकाशेच मिळत नसून ही प्रकरणही मिळत नसल्याची उत्तर दिली जात आहेत. इतकच नाही तर प्रकरण मिळाल्यास या प्रकरणाला नकाशाच नसल्याचे तोंडी उत्तर दिले जात आहे. इतकच नाही एक-दोन वर्षांपूर्वी मोजणी केलेल्या प्रकरणांचेही नकाशेच मिळत नसून ही प्रकरणच सापडत नसल्याची उत्तर दिले जात आहेत. दापोली तालुका भूमी अभिलेख कार्याचा कारभार सध्या ‘हम करे सो कायदा’ या तत्त्वाने सुरू असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी या कार्यालयाच्या बेजबाबदार कारभारामुळे नकाशासाठी फेऱ्या मारून मेटाकुटीस आला आहे.

जो पक्षकार चव्वल जास्त मोजणार वजन जास्त ठेवणार त्यांचेच काम होणार या उक्तीप्रमाणेच या कार्यालयाचा कारभार सध्या सुरू आहे. कार्यालयातील साहेब आठवड्यातून एक ते दोन वेळाच येथे हजेरी लावतात सर्वसामान्य नागरिक शेतकरी जेष्ठ व्यक्ती या कार्यालयात आपल्या जागांच्या शेतीच्या नकाशासाठी भूमी अभिलेख कार्यालयात अक्षरशः दिवस खर्ची घालून ग्रामीण भागातून येत असतात. मात्र ग्रामीण भागातील नकाशे तर सोडाच पण शहरी भागातील प्रकरणांचे नकाशेही या कार्यालयात सापडत नाहीत मिळत नाहीत अशा स्वरूपाची उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. या सगळ्याची दखल जिल्हा प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधी विद्यमान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेऊन या कार्यालयाच्या चौकशीचे आदेश द्यावेत तसेच संबंधित अधिकाऱ्यांनाही समज द्यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक शेतकरी करत आहेत. कार्यालयात दाखल झालेले पक्षकारांचे अर्ज तपासून प्रकरणनिहाय या सगळ्याची तपासणी जिल्हा प्रशासनाने तातडीने करावी व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आता केली जात आहे.

Total Visitor Counter

3386267
Share This Article