कोळंबे प्रशालेचे मुख्याध्यापक रवींद्र मुळये ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

संगमेश्वर: तालुक्यातील कोळंबे येथील श्रीमती कमळजाबाई पांडुरंग मुळये हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये तब्बल ३२ वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे आदर्श शिक्षक आणि मुख्याध्यापक रवींद्र मुळये यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भावपूर्ण सत्कार करण्यात आला. शाळेच्या सभागृहात आयोजित या शानदार सोहळ्यात शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मुळये यांच्या कार्याचा गौरव केला. ३१ वर्षे गणिताचे निष्णात शिक्षक आणि अंतिम एक वर्ष मुख्याध्यापक म्हणून त्यांनी बजावलेली सेवा विद्यार्थ्यांच्या आणि संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाची ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.या सोहळ्याला संस्था अध्यक्ष नयन मुळये, सचिव दिलीप मुळये, शाळा समिती अध्यक्ष संदेश जोशी, माजी मुख्याध्यापक बी. डी. फराटके, पंचायत समिती सदस्य सुहास मायंगडे यांच्यासह बापू मुळये, नथुराम पाचकले, पोलीस पाटील सुनील शिगवण, विकास फेपडे, अमोल पाटणे, स्वप्नील मुळये आणि प्रथमेश मुळये आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मुळये यांच्या पत्नी सौ. स्नेहल मुळये, ओंकार, शिवानी आणि आकांक्षा मुळये यांनीही या कौटुंबिक व सामाजिक सोहळ्यात सहभाग घेतला. एकाच शाळेत सलग तीन दशकांहून अधिक काळ सेवा केल्यामुळे मुळये यांचे विद्यार्थ्यांशी असलेले नाते अत्यंत जिव्हाळ्याचे बनले होते, ज्याची प्रचिती त्यांच्या निरोप समारंभावेळी आली.आपल्या लाडक्या ‘मुळये सरांना’ निरोप देताना अनेक विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. मनोगत व्यक्त करताना खुद्द रवींद्र मुळये यांनाही अश्रू अनावर झाले; ३२ वर्षांचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिल्याने ते भावूक झाले होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आरोग्यदायी आणि सुखसमाधानाचे जावो, अशा शुभेच्छा दिल्या. शिस्तप्रिय पण तितकेच विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रवींद्र मुळये यांच्या निवृत्तीमुळे कोळंबे शैक्षणिक क्षेत्रात एका पर्वाचा समारोप झाला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *