GRAMIN SEARCH BANNER

माध्यमिक विद्यालय, सोनवडे येथे ‘संस्कारयुक्त शिक्षण आणि विद्यार्थी’ या विषयावर माधव अंकलगे यांचे व्याख्यान संपन्न

Gramin Varta
47 Views

देवरुख: माध्यमिक विद्यालय, सोनवडे येथे नवरात्र उत्सवानिमित्त शारदीय व्याख्यानमालेअंतर्गत  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त माधव रतनबाई विश्वनाथ अंकलगे यांनी ‘संस्कारयुक्त शिक्षण आणि विद्यार्थी’ या विषयावर विद्यार्थी व उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे , प्रमोद खेडेकर , मुख्याध्यापक शिवाजी बंडगर, राजन खेडेकर , राजाराम घाणेकर, उदय जोशी यांची उपस्थिती होती.

माधव अंकलगे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना समजेल अशी संस्कारयुक्त शिक्षण यासंबंधीची काही उदाहरणे दिली. त्यामध्ये गुलाबाचे काटे त्या गुलाबाचे संरक्षण करतात. मोबाईलमधील मेमरी कार्ड व डाटा त्याचा वापर उपयुक्त कार्यासाठी होतो, तसेच विद्यार्थ्यांमधील चांगल्या गुणांचा विकास कशाप्रकारे होऊ शकतो, आधुनिक काळातील रोबोटच्या साह्याने दिले जाणारे शिक्षण, विद्यार्थ्यांच्या  व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत शिक्षकांचे महत्त्व याबाबत सविस्तर विवेचन केले. 

पालक व शिक्षक यांनी केलेल्या संस्कारमुळे प्रत्येक व्यक्ती उत्तम नागरिक बनतो. सकाळी लवकर उठणे, चांगल्या सवयी अंगीकारणे, आपल्या आई-वडिलांना कधी अपमानित न करणे, राष्ट्रभक्ती व देशासाठी सीमेवर लढण्याचे स्वप्न बाळगणे ही चार महत्त्वाची सूत्रे याप्रसंगी सांगितली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाप्रती असणारी तळमळ व त्यांचे संस्कार यासंबंधीची उदाहरणे दिली. तसेच महान राष्ट्रपुरुषांचे आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेण्यासाठी अनेक उदाहरणे दिली.

अध्यक्षीय समारोपात संस्थाध्यक्ष श्री. सनगरे यांनी वक्ते माधव अंकलगे यांच्या मार्गदर्शनातील काही महत्त्वपूर्ण घटक नमूद करताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील प्रगतीसाठी ह्या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे नमूद करून, वक्त्यांप्रती आदर व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. बंडगर यांनी केले, सूत्रसंचलन सायली बनकर यांनी तर आभार सुजय सरदेसाई यांनी मानले.

Total Visitor Counter

2645294
Share This Article