GRAMIN SEARCH BANNER

राजीवडा येथील मासेविक्रेत्यांना शेडमध्ये जागा द्या : मनसेची मागणी

जेटीची केली संयुक्त पाहणी

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील राजीवडा जेटी येथे मत्स्यविभागाने बांधलेल्या सुसज्ज शेडमध्ये मासेविक्री करणाऱ्या महिला बसत नसून, त्या शिवखोलघाटीच्या पायथ्याशी रस्त्यावर विक्री करत असल्याचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उचलून धरला आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असून, वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असल्याने मनसेने पालिकेचे अधिकारी, मेरिटाईम बोर्ड, मत्स्यविभाग आणि स्थानिक नागरिक यांच्यासोबत आज (१९ जून २०२५) संयुक्त पाहणी केली.

मनसेने पालिकेच्या कारभाराविरोधात नुकताच मोर्चा काढला होता, त्यावेळी अनधिकृत होर्डिंग्जसह अनेक गैरसोयींचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी सोमवारपासून बदल दिसतील असे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यास सुरुवात झाली होती. याच अनुषंगाने, राजीवडा येथील मासेविक्रीच्या समस्येबाबत मनसेला प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर आज ही पाहणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान, स्वतंत्र शेड बांधलेली असूनही महिला रस्त्यावर बसत असल्याचे निदर्शनास आले. तसेच, शेडमध्ये मासेमारीचे साहित्य साठवून ठेवले जात असल्याने रस्ता अडवला जात आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, विशेषतः सचिन शिंदे, अरविंद मालाडकर, महेंद्र गुळेकर आणि बाबय भाटकर यांनी मच्छीविक्री करणाऱ्या महिलांना समजावून सांगितले की, त्यांनी दोन दिवसांत आपले साहित्य शेडमधून काढून घ्यावे आणि रस्त्यावर बसणाऱ्या महिलांची सोय त्या शेडमध्ये करावी.

- Advertisement -
Ad image

शेडची काही ठिकाणी दुरवस्था झाली असून, तिची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणीही मनसेने मत्स्यविभाग, मेरिटाईम बोर्ड आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली. राजीवडा येथील शेडच्या बाजूला भराव करून शेडच्या विस्ताराबाबत तसेच अधिक काही मागण्या असल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालकमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
या पाहणीप्रसंगी मनसेतर्फे अरविंद मालाडकर, सचिन शिंदे, महेंद्र गुळेकर, बाबय भाटकर, महिला शहर सचिव संपदा राणा, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम आणि शहर सचिव गौरव चव्हाण आदी उपस्थित होते.

Total Visitor

0214215
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *