रत्नागिरी : नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने मातृभूमीपासून दूर राहत असतानाही आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी असलेली नाळ घट्ट ठेवणाऱ्या रत्नागिरीतील महिलांनी सातासमुद्रापार नायजेरियातही भारतीय सण-परंपरांचा जागर केला. नागपंचमीच्या निमित्ताने नायजेरियात राहणाऱ्या भारतीय महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी केली. यावेळी नागपंचमीची पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
नायजेरियामध्ये राहणाऱ्या भारतीय महिलांसाठी हा सोहळा केवळ धार्मिक विधी न राहता मायभूमीशी जोडणारा भावनिक क्षण ठरला. भारतीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी महिलांनी एकत्र येत हा उत्सव उत्साहात साजरा केला. विशेष म्हणजे या महिलांनी एकत्र येऊन ‘सहेली’ हा ग्रुप तयार केला असून, वाढदिवस तसेच इतर छोट्या-मोठ्या कारणांसाठी एकत्र येत आनंद साजरा करण्याची त्यांची परंपरा आहे.
या समूहामध्ये प्रज्ञा सामणी, पल्लवी रांदे, नूतन सोनटक्के, धनश्री वाघमारे, स्वाती चव्हाण, अर्चना बायधरे, ज्योती घाग, निसुपा बेंद्रे, श्रुती देशपांडे, सोनल कुलकर्णी यांच्यासह अन्य महिलांचा सहभाग आहे. या महिलांनी एकत्र येत नागपंचमीच्या पूजेची तयारी केली. नायजेरियातील परदेशी वातावरणात भारतीय पद्धतीने सण साजरा झाल्याने उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
गेल्या दोन वर्षांपासून या महिला गुढीपाडवा, महिला दिन, रक्षाबंधन, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यांसारखे विविध भारतीय सणही एकत्र येऊन साजरे करीत आहेत. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने नायजेरियात वास्तव्य असले तरी भारतीय सण, संस्कृती आणि परंपरांशी असलेले नाते त्यांनी कायम जपले आहे.
परदेशात राहताना नातेवाईक आणि आप्तेष्टांपासून दूर असलेल्या या महिलांसाठी असे सण म्हणजे एकत्र येण्याची आणि आपलेपणाचा अनुभव घेण्याची संधी ठरते. त्यामुळे नागपंचमीच्या निमित्ताने झालेल्या या पारंपरिक सोहळ्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. सातासमुद्रापार नायजेरियात भारतीय संस्कृतीचा सुगंध दरवळवत रत्नागिरीतील महिलांनी नागपंचमीची परंपरा उत्साहाने जपली.
भारतीय महिलांनी एकत्र येत नायजेरियात साजरी केली नागपंचमी
Leave a Comment




