GRAMIN SEARCH BANNER

दापोली : बुरोंडीत दिवसाढवळ्या घरफोडी; चोरट्यांनी पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

Gramin Varta
4 Views

दापोली: दापोली तालुक्यातील बुरोंडी, समर्थ नगर येथील एका बंद घरात दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी केवळ सहा तासांच्या आतमध्ये घरातील कपाटाचे लॉकर तोडून सुमारे ३ लाख ९६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीलम अविनाश शिरगावकर (वय ४५, व्यवसाय-मच्छीमारी, रा. बुरोंडी समर्थ नगर, दापोली) यांच्या राहत्या घरी दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०८.०० वाजल्यापासून ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंतच्या दरम्यान ही चोरी झाली.

फिर्यादींचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या हॉलमधील स्लायडिंगची खिडकी बाहेरून सरकवून त्याद्वारे घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी घरातील लाकडी कपाटाचे लॉकर कोणत्यातरी हत्याराने तोडले.

लॉकरमध्ये ठेवलेले फिर्यादींचे तसेच त्यांच्या मामे-सासूकडील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेली.

चोरट्यांनी फिर्यादींच्या घरातून एकूण ३,९६,०००/- रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. यात १,२०,०००/- रुपये किमतीची १२ ग्रॅम वजनाची सोन्याचे मणी असलेली बोरमाळ, ६०,०००/- रुपये किमतीची ६ ग्रॅम वजनाची बदामाच्या आकाराचे पान गुंफलेली सोन्याची चेन, ५०,०००/- रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स, तसेच ३०,०००/- रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स आणि १०,०००/- रुपये किमतीची १.५ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ यांचा समावेश आहे.
दागिन्यांसह चोरट्यांनी घरातील विविध ठिकाणी ठेवलेली रोख रक्कमही चोरून नेली. यात डायरी, पर्स आणि प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवलेले ५००, २००, १०० आणि ५० रुपये दराच्या भारतीय चलनाच्या नोटा, अशी एकूण १,४६,०००/- रुपये रोख रक्कम चोरीस गेली आहे.
विशेष म्हणजे, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादींच्या घरात चोरी केल्यानंतर त्यांच्या दिर (नरेंद्र शिरगावकर) यांच्याही घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या घटनेनंतर फिर्यादी नीलम शिरगावकर यांनी दि. १७/१०/२०२५ रोजी रात्री ११.१५ वाजता दापोली पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. दापोली पोलिसांनी गु.आर. क्र. १८९/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या संबंधित कलमांखाली अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या घरफोडीचा कसून तपास करत आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे समर्थ नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Total Visitor Counter

2669493
Share This Article