चिपळूण : मुंबई–गोवा महामार्गावरील कोंढमळा परिसरात धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या डंपरला मागून येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत महावितरणचा कर्मचारी व कबड्डीपटू अमित एकनाथ हुमणे (वय ३०, रा. आगवे) याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरा डंपर चालक गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डंपर चालक सुरेश दौलत हुमणे (वय ५०, रा. आगवे) हे आपला डंपर घेऊन आगवेहून चिपळूणच्या दिशेने जात होते. त्यांच्या सोबत अमित हुमणे हा प्रवास करत होता. दरम्यान, कोंढमळा येथील एका वळणावर शौकद अली (वय ५०, रा. जयगड) याने कोणतीही सूचना फलक, इंडिकेटर अथवा सुरक्षात्मक उपाययोजना न करता हायवा डंपर महामार्गाच्या डाव्या लेनमध्ये उभा करून ठेवला होता. याच उभ्या डंपरला सुरेश हुमणे यांच्या डंपरची जोरदार धडक बसली.
या अपघातात डंपरच्या केबिनमध्ये बसलेल्या अमित हुमणे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक सुरेश हुमणे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धोकादायक स्थितीत हायवा डंपर उभा केल्याप्रकरणी संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




