तरुणावर गुन्हा दाखल
संगमेश्वर: गणेशोत्सवाचा मंगलमय माहोल असतानाच संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे शेवरवाडी येथे एका युवतीसोबत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली असून, आरोपी संदीप जानू खडसडे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवती आपल्या मैत्रिणीच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी जात होती. याचवेळी आरोपी संदीप खडसडे याने तिच्याशी असभ्य वर्तन केले. हे पाहिल्यानंतर पीडितेच्या मैत्रिणीने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, खडसडेने उलट तिच्यावर, तिच्या बहिणीवर आणि काकीवर अश्लील शिवीगाळ करत लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पीडितेने तात्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी संदीप खडसडे विरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी शंकर नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. एका बाजूला गणपती उत्सव शांततेत आणि आनंदात साजरा होत असताना, दुसरीकडे अशा घटना समाजात खेदजनक असल्याचे स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
संगमेश्वर : कोळंबे शेवर वाडी येथे गणपती दर्शनासाठी आलेल्या तरुणीशी गैरवर्तन
