GRAMIN SEARCH BANNER

दारूच्या नशेत बोटीवरून खाडीत पडलेल्या खलाशाचा बुडून मृत्यू

Gramin Varta
143 Views

राजापूर : तालुक्यातील साखरीनाटे येथील डुंगेरी जेटी परिसरात दारूच्या नशेत बोटीवरून खाडीच्या पाण्यात पडून खलाशाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मदन हवल्दार चौधरी (वय २३, राह. नेपाळ, सध्या रा. साखरीनाटे, नजफनगर) असे मयत खलाशाचे नाव आहे.

नाटे पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मदन चौधरी हा मोहसिन अब्दुल्ला कोतवडकर यांच्या बोटीवर खलाशी म्हणून काम करत होता. शुक्रवार, दि. १६ रोजी तो दारूच्या नशेत बोटीवर कामासाठी आला होता. रात्री बोटीवरील इतर खलाशी झोपलेले असताना मदन उशिरापर्यंत पार्सल आणलेली दारू पित बसला होता. दारूच्या नशेत त्याचा तोल जाऊन तो बोटीवरून थेट खाडीच्या पाण्यात पडला. ही घटना सहकारी खलाशांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पाण्यात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो सापडू शकला नाही.

दरम्यान, शोध सुरू असतानाच रविवार, दि. १८ रोजी जैतापूर खाडीतील नाटे डुंगेरी परिसरात पाण्यात मदन चौधरी याचा मृतदेह आढळून आला. या घटनेप्रकरणी बोटीचे मालक मोहसिन कोतवडकर यांनी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Total Visitor Counter

3072992
Share This Article