नगराध्यक्षपदाच्या उमेदवार दीक्षा खंडागळे यांचे विकासाचे ‘व्हिजन’ ठरले चर्चेचा विषय
देवरुख (विशेष प्रतिनिधी): देवरुख नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा ‘गाव विकास समिती’ आणि ‘आम आदमी पार्टी’ (आप) यांच्या युतीने लक्षणीय आघाडी घेतली आहे. या युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून गाव विकास समितीच्या दीक्षा रवींद्र खंडागळे या ‘आप’च्या ‘झाडू’ चिन्हावर रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी देवरुख शहराच्या सर्वांगीण विकासाचे एक अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ठोस व्हिजन मतदारांसमोर मांडले असून, त्यांचे हे व्हिजन सध्या शहरातील सुजाण मतदारांमध्ये आणि सुशिक्षित वर्गात चर्चेचा विषय ठरले आहे.
गाव विकास समितीचे देवरुख निवडणूक प्रभारी डॉ. मंगेश कांगणे यांच्या कणखर नेतृत्वाखाली समितीने अत्यंत कमी वेळेत आणि मर्यादित साधनसामुग्रीत स्वतंत्रपणे एक प्रभावी आणि वेगवान प्रचारयंत्रणा राबवली आहे. या धडाकेबाज यंत्रणेमुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. दीक्षा खंडागळे यांची भूमिका आणि विकासाचे व्हिजन सर्वसामान्य जनतेपर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचण्यास मोठी मदत झाली आहे, अशी चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे.
या निवडणुकीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली असताना, गाव विकास समिती आणि ‘आप’ युतीने मात्र अत्यंत सकारात्मक प्रचाराचा मार्ग स्वीकारला आहे. प्रतिस्पर्ध्यांवर कोणत्याही प्रकारची वैयक्तिक टीका-टिप्पणी न करता, केवळ विकासाचे ठोस व्हिजन आणि सुशासनाच्या मुद्द्यांवर भर दिल्यामुळे सौ. खंडागळे यांची प्रचार मोहीम देवरुखमधील मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे. समितीचे अध्यक्ष उदय गोताड आणि संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच डॉ. मंगेश कांगणे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार यंत्रणा कार्यरत आहे, याला ‘आप’चे जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र जाधव यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
सौ. दीक्षा खंडागळे यांनी आपल्या प्रचारात देवरुखच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा जनतेसमोर ठेवला आहे. यामध्ये त्यांनी आरोग्य, शिक्षण, क्रीडा, शेती आणि पारदर्शक कारभारावर विशेष भर दिला आहे. आरोग्य सुविधांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आई-बाबा आरोग्य सेवा योजना’ सुरू करण्याचा, तसेच अद्ययावत ‘डॉ. कानिटकर आरोग्य सुविधा केंद्र’ उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. शिक्षण आणि युवकांसाठी मोफत अभ्यासिका आणि ‘नीट’ (NEET) व ‘जेईई’ (JEE) परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कांगणे वाडी येथे भव्य कबड्डी स्टेडियमची उभारणी करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. पायाभूत सुविधांच्या दृष्टीने शहरासाठी योग्य ‘पार्किंग धोरण’, उत्तम रस्ते आणि अत्याधुनिक ड्रेनेज सिस्टीमवर त्यांनी भर दिला आहे, तसेच पाणीपट्टीत सवलत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. कृषी व पर्यटन क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी ‘समृद्ध शेतकरी योजना’ आणि पर्यटनवाढीसाठी ‘देवनगरी देवरुख कक्ष’ सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नगरपंचायतीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी खास ‘नागरिकांची कमिटी’ स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
केवळ आश्वासने न देता, त्या पूर्ण करण्याची ‘गॅरंटी’ देत सौ. दीक्षा खंडागळे यांनी देवरुखवासीयांना साद घातली आहे. त्यांच्या या अभ्यासपूर्ण आणि संयमी प्रचारामुळे देवरुखमधील सुशिक्षित आणि विकासाभिमुख मतदार या युतीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याचे चित्र सध्या निवडणुकीच्या धामधुमीत दिसत आहे.






