अंतराळ युगाचा एक अध्याय पूर्ण; २७ वर्षांची दैदिप्यमान कारकिर्द पूर्ण
दिल्ली: भारतीय वंशाच्या प्रसिद्ध नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 27 वर्षांच्या दीर्घ आणि गौरवशाली सेवेनंतर नासातून निवृत्ती घेतली आहे. मानवी अंतराळ उड्डाण क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी केलेले कार्य केवळ अमेरिकेसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
सुनीता विल्यम्स या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ अडकून राहिल्या होत्या. नासाच्या बोईंग स्टारलाइनर आणि स्पेसएक्स क्रू-9 मोहिमेदरम्यान त्यांनी आपल्या सहकारी बुच विल्मोर यांच्यासह 286 दिवस अंतराळात घालवले. अखेर मार्च 2025 मध्ये त्या स्पेसएक्सच्या यानातून सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या.नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी त्यांच्या निवृत्तीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सुनीता विल्यम्स या मानवी अंतराळ उड्डाणातील अग्रणी होत्या. अंतराळ स्थानकावर त्यांच्या नेतृत्वाने आणि व्यावसायिक मोहिमांनी भविष्यातील शोधयात्रांचा पाया घातला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील त्यांच्या योगदानामुळे आर्टेमिस मोहिमांना चंद्रावर आणि मंगळाकडे वाटचाल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या असामान्य यशाने येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल.”
1998 मध्ये नासामध्ये निवड झालेल्या सुनीता विल्यम्स यांनी तीन अंतराळ मोहिमांमध्ये एकूण 608 दिवस अंतराळात घालवले आहेत. हा विक्रम नासाच्या अंतराळवीरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकाच मोहिमेतील सर्वाधिक कालावधीच्या बाबतीत त्या अमेरिकन अंतराळवीरांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी आतापर्यंत नऊ वेळा अंतराळात स्पेसवॉक केले असून त्यात त्यांनी एकूण 62 तास 6 मिनिटे घालवली आहेत. अंतराळात मॅराथॉन धावणारी पहिली व्यक्ती म्हणूनही त्यांची ओळख आहे.
त्यांचे पहिले अंतराळ उड्डाण 9 डिसेंबर 2006 रोजी स्पेस शटल डिस्कव्हरीद्वारे एसटीएस-116 मोहिमेत झाले. एक्स्पेडिशन 14/15 च्या सदस्य म्हणून त्यांनी फ्लाइट इंजिनीअर म्हणून काम केले आणि चार स्पेसवॉक करत 29 तास 17 मिनिटांचा तेव्हाचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्यांची दुसरी मोहीम 14 जुलै 2012 रोजी कझाकस्तानमधील बैकोनूर कोस्मोड्रोमवरून सुरू झाली होती. एक्स्पेडिशन 32/33 दरम्यान त्यांनी 127 दिवस अंतराळात घालवले आणि स्टेशनवरील महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यासाठी तीन वेळा स्पेसवॉक केला. तिसरी आणि सर्वात दीर्घ मोहीम जून 2024 मध्ये बोईंग स्टारलाइनरद्वारे सुरू झाली होती. या मोहिमेत त्या एक्स्पेडिशन 71/72 मध्ये सहभागी झाल्या आणि आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ अंतराळ स्थानकावर अडकून राहिल्या होत्या.
सुनीता विल्यम्स यांचे वडील डॉ. दीपक पंड्या हे गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन गावचे असून ते अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. त्यांच्या आईचा वंश स्लोव्हेनियन आहे. ओहायोमधील यूक्लिड येथे जन्मलेल्या सुनीता यांना मॅसॅच्युसेट्समधील नीधॅम हे गाव आपले हृदयस्थान वाटते. त्या आपल्या पती मायकेल यांच्यासोबत वेळ घालवणे, कुत्र्यांसोबत खेळणे, व्यायाम करणे, घर, गाड्या व विमाने दुरुस्त करणे, हायकिंग आणि कॅम्पिंग करणे यांचा आनंद घेतात.
आपल्या निवृत्तीच्या वेळी बोलताना सुनीता विल्यम्स म्हणाल्या, “मला ओळखणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की अंतराळ माझं अत्यंत आवडतं ठिकाण आहे. अंतराळवीर कार्यालयात सेवा देण्याचा आणि तीन वेळा अंतराळात उड्डाण करण्याचा मान मला मिळाला, हे माझं मोठं सौभाग्य आहे. नासामधील माझी 27 वर्षांची कारकीर्द अद्भुत होती, याचं मुख्य कारण माझ्या सहकाऱ्यांचा पाठिंबा आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, तेथील लोक, अभियांत्रिकी आणि विज्ञान खरोखरच विस्मयकारक आहे. यामुळे चंद्र आणि मंगळावरील पुढील मोहिमा शक्य झाल्या आहेत. आम्ही घातलेला पाया या मोहिमांना अधिक सोपं करेल अशी मला आशा आहे. नासा आणि त्याच्या भागीदार संस्था पुढील टप्पे गाठतील याची मी उत्सुकतेने वाट पाहते.”सुनीता विल्यम्स यांच्या निवृत्तीसह नासाच्या इतिहासातील एक सुवर्णपान संपले असले, तरी त्यांनी घडवलेला वारसा आणि दिलेली प्रेरणा भविष्यातील अनेक पिढ्यांना अंतराळाकडे झेप घेण्यास नक्कीच प्रेरित करत राहील.







